पाऊस लांबल्यास हॉटेल्स, विविध प्रकल्पांवर होणार परिणाम

>>दीपक पवार

कडक उन्हामुळे राज्यभरातील धरणे, नदी, तलाव आणि विहिरींनी तळ गाठला आहे. तर आदिवासी पाडय़ांमध्ये पाण्यासाठी वणवण होत आहे. मुंबईतील परिस्थितीही दिवसेंदिवस बिकट होत असून पाऊस पडला नाही तर मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो. तसेच विहिरींमधील पाण्याची पातळी 12 फुटांवरून 22 फुटांपर्यंत खालावली आहे. म्हणजेच मुंबईतील विहिरींचे पोट 10 फुटांनी खपाटीला गेल्यामुळे विविध बांधकाम प्रकल्प, हॉटेल्स आणि विविध ठिकाणी टँकर्सद्वारे होणारा पाणीपुरवठा कमी झाल्याचे चित्र आहे.

मुंबईत बोरिवलीपासून ते कुलाब्यापर्यंत विविध ठिकाणी जवळपास 400 विहिरी आहेत. या विहिरींमधील पाण्याचा मुंबईतील हॉटेल्स, मेट्रो प्रकल्पांसह विविध बांधकाम प्रकल्पांसाठी पुरवठा करण्यात येतो, मात्र या विहिरींच्या पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे कमालीची घटत चालल्याचे उघड झाले आहे. पाण्याची पातळी कमी झाल्याने टँकर्स भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

300 टँकर जाग्यावर उभे

कडक उन्हामुळे मुंबईतील विविध बांधकाम प्रकल्पांसाठी पाण्याची मागणी दुपटीने वाढली आहे; परंतु विहिरींमध्ये पाणीच नसल्यामुळे दीड हजार टँकर्सपैकी 300 टँकर जाग्यावरच उभे आहेत. परिणामी, त्यांचा देखभाल खर्च वाढला असून टँकरचालकांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. हॉटेल्स, गाडय़ा धुण्यासाठी पाणी लागते, पण विहिरींतील पाण्याने तळ गाठल्यामुळे पाणीपुरवठा करताना टँकरचालकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे.

दक्षिण मुंबईत पाण्याची पातळी हळूहळू घटतेय

दक्षिण मुंबईला लागूनच समुद्र असल्यामुळे येथील विहिरींची पातळी 17 ते 18 फुटांपर्यंत आहे. या विहिरींच्या पाण्याची पातळी हळुहळू घटतेय. दक्षिण मुंबईत 15 ते 20 विहिरी आहेत. मेट्रोच्या आसपास मोठय़ा संख्येने विहिरी आहेत, मात्र कडक उन्हामुळे झपाटय़ाने बाष्पीभवन होत असून पाऊस पडला नाही तर येथील विहिरींची पातळीही घटण्याची भीती मुंबईतील वॉटर टँकर्स असोसिएशनचे अध्यक्ष जसबीर सिंह वीरा यांनी व्यक्त केली.

सिमेंट–काँक्रीटमुळे पाणीपातळी घटली

मुंबईत जागोजागी सिमेंट-काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. विविध ठिकाणी गगनचुंबी टॉवर्स उभे राहत आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळे पश्चिम उपनगरासह अनेक ठिकाणी विहीरींमधील पाणीपातळी घटल्याचे जसबीर सिंह वीरा म्हणाले.

 दहा हजार लिटरचा एक टँकर असतो. पूर्वी 7 ते 8 हजार फेऱया होत होत्या, परंतु आता विहिरींनी तळ गाठल्यामुळे टँकर्सच्या फेऱया पाच हजारांवर आल्या आहेत.  डॉकयार्ड रोड, रे रोड, वडाळा, अंधेरी, कांदिवली, बोरिवली, प्रभादेवी, माहीम, चेंबूरमधील विहिरीतील पाण्याची पातळी घटली आहे.  बीपीटी येथील विहिरींची पातळी झपाटय़ाने घडल्याचे दिसत आहे.