खिलाडूवृत्ती दिसणार की तळपायाची आग मस्तकात जाणार; पंडय़ासाठी मुंबईकरांचे ट्रोल की गोड बोल

हिंदुस्थानात क्रिकेटची खरी संस्कृती मुंबईत आहे. मुंबईचे क्रिकेटप्रेमी किती सुजाण, समजूतदार आणि खिलाडूवृत्तीचे आहेत, याचे वारंवार वानखेडेवर दर्शन घडत आलेय. पण रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यामुळे मुंबईकर क्रिकेटप्रेमी खूपच दुखावले आहे आणि हार्दिक पंडय़ाकडे नेतृत्व सोपवल्यामुळे त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. गेल्या दोन सामन्यांत हार्दिक पंडय़ाविरुद्ध केलेल्या शेरेबाजीमुळे पंडय़ाच नव्हे तर खुद्द मुंबई इंडियन्सची फ्रेंचायझीजही हादरली आहे. त्यामुळे सोमवारी वानखेडेवर होणाऱ्या सामन्यात मुंबईकरांची खिलाडूवृत्ती दिसते की ट्रोलचे कडवे बोल हे सामना सुरू झाल्यानंतरच कळू शकेल.

 आयपीएल सुरू होताच मुंबईकरच नव्हे तर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनीही आपला राग व्यक्त करताना मुंबई इंडियन्सच्या अहमदाबाद आणि हैदराबाद या दोन्ही ठिकाणी हार्दिक पंडय़ावर ट्रोल हल्ला करताना आक्षेपार्ह घोषणा दिल्या होत्या. पंडय़ाविरुद्ध घोषणा ऐकून सारेच क्रिकेटपटू आणि क्रिकेट दिग्गज हैराण झाले आहेत. सर्वांनीच हार्दिकला आपला पाठिंबा देताना मैदानातील घोषणांकडे दुर्लक्ष करण्याचा आणि शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. पण वानखेडेवर मुंबई पुन्हा एकदा पंडय़ाची शांतता भंग करतात की शांततेत सामन्याचा आनंद लुटतात, याकडेच सारे लक्ष वेधले गेले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

अपमानाचा बदला अपमान

रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढण्याचा प्रकार हा निव्वळ अपमान आहे. हा अपमान रोहितचा नसून समस्त मुंबईचा आहे. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीत साम्य आहे, पण चेन्नईच्या संघव्यवस्थापनाने धोनीला नेहमीच सन्मानजनक वागणूक दिली आहे. मात्र मुंबई इंडियन्सच्या संघव्यवस्थापनाने रोहितला काहीही न कळवता काढणे नक्कीच दुर्दैवी आहे. जर रोहितला कर्णधारपदावरून मुक्तच करायचे होते तर या आयपीएलच्या दरम्यान त्याला सन्मानाने मुक्त करता आले असते. रोहितचा अपमान म्हणजे मुंबईचा अपमान. त्यामुळे रोहितच्या अपमानाचा बदला वानखेडेवर नक्कीच घेतला जाईल. रोहित काढल्यामुळे जशा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या आहेत तशा 1 एप्रिलला हार्दिक पंडय़ाच्या भावनाही दुखावल्या जातील.

– योगेंद्र उत्तम, क्रिकेटप्रेमी

आयपीएलला क्रिकेटप्रेमी नव्हे, टाइमपासप्रेमी येतात

मुंबईची क्रिकेटसंस्कृती जगद्विख्यात आहे. मुंबईची खिलाडूवृत्ती असो किंवा मुंबईचे स्पिरिट अवघ्या जगाने नेहमीच काwतुक केले आहे. पण आयपीएलचा फंडा वेगळा आहे. येथे क्रिकेटप्रेमी कमी आणि टाइमपासप्रेमीच अधिक येतात. सर्वांना थोडासा विरंगुळा आणि सेल्फी आणि पह्टोसेशनमध्येच इंटरेस्ट असतो. त्यामुळे वानखेडेवर जमलेले टाइमपासप्रेमी काय करतील, याचा नेम नसल्याची जळजळीत प्रतिक्रिया क्रिकेट संघटकाने दिलीय.

वानखेडेवर क्रिकेट संस्कृतीचे दर्शन घडेल

रोहित शर्माला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी हार्दिक पंडय़ाकडे मुंबईचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. असे असले तरी या निर्णयामुळे काही जण नक्कीच दुखावले आहेत तर काहींनी या निर्णयाचे स्वागत केलेय. पंडय़ाबद्दल राग असला तरी उद्या वानखेडेवर मुंबईच्या खिलाडूवृत्तीचे आणि क्रिकेट संस्कृतीचेच दर्शन घडेल. सारे चाहते विजयासाठी मुंबईच्या संघाला पाठिंबा देतील. बाकी ट्रोल वगैरे गोष्टी दुय्यम आहेत. एखाद् दुसऱ्या प्रेक्षकाने काही कमेंट दिली म्हणजे विरोध केला असे होत नाही. हजारो प्रेक्षक मुंबई आणि पंडय़ाच्या सोबत असतील.

– राजेंद्र महागावकर, क्रिकेटप्रेमी

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)