‘इसिस’ मॉडय़ूलचा पर्दाफाश, कोंढव्यातील डॉक्टरला अटक! ‘एनआयए’ची कारवाई 

देशविरोधी कारवाया करण्यासाठी बेरोजगार तरुणांचा ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी संघटना इसिसमध्ये सामील करून घेणाऱया एका डॉक्टरला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुण्यातील कोंढवा येथून अटक केली आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्रातील इसिस मॉडय़ूलचा पर्दाफाश करण्यात एनआयएला यश आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना एनआयएने अटक केली आहे.

डॉ. अदनानली सरकार (43) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. कोंढव्यातील डॉ. अदनानलीच्या घरावर एनआयएने छापा टाकून त्याला अटक केली. त्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्, इसिसशी संबंधित अनेक दस्ताऐवज जप्त केले आहे. या महाराष्ट्र इसिस मॉडय़ूलप्रकरणी यापूर्वी एनआयने मुंबईतील तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली आहे.

 दहशतवाद्यांना आश्रय देणाऱयाला बेडय़ा 

 दहशतवाद्यांना  आश्रय देण्यासाठी मदत करणाऱयाला एटीएसने अटक केली आहे. त्याच्याकडे  सखोल तपास सुरु आहे. दरम्यान, कोंढवा पोलिसांनी संबंधित घरमालकाची कशापद्धतीने विचारपूस केली होती. त्याच्याविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली, यासारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कदीर पठाण (रा. कोंढवा ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी,  मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढकारा. रतलाम, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या दहशवाद्यांची नावे आहेत. मोहम्मद शहनकाज आलम फरार झाला आहे.