ISPL 2024 – चेन्नई सिंगम्सने 96.4 लाखात करारबद्ध केले 16 खेळाडू, सुमीत ढेकळेसाठी 19 लाख मोजले

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या (आयएसपीएल) पहिल्यावहिल्या हंगामासाठीचा लिलाव रविवारी पार पडला. 6 ते 15 मार्च 2024 या कालावधीत ठाण्यातील दादोजी कोंडदेव मैदानात रंगणाऱ्या स्पर्धेत प्रमुख फ्रँचायझी असलेल्या चेन्नई सिंगम्सने पश्चिम विभागाचा स्टार खेळाडू सुमीत ढेकळे उर्फ ‘बाहुबली’सह 16 खेळाडूंना 96.4 लाख रुपयांमध्ये करारबद्ध केले. सुमीतसाठी चेन्नईने 19 लाख रुपयांची बोली लावली.

राजदीपकुमार गुप्ता, संदीपकुमार गुप्ता आणि अभिनेता सूर्या शिवकुमार हे चेन्नई सिंगम्स संघाचे प्रमोटर आहेत.चेन्नई सिंगम्स संघाने 1 कोटींच्या पर्ससह 16 खेळाडूंना 96.4 लाखांच्या एकत्रित रकमेत खरेदी केले. त्यामुळे चेन्नई सिंगम्स लिलावात सर्वाधिक बोली लावणारा संघ ठरला. सह-मालक राजदीप कुमार गुप्ता आणि कोअर टीममध्ये राहुल पांडे, आशिष जैस्वाल आणि संदीप जैस्वाल यांनी लिलाव प्रक्रियेत चेन्नई सिंगम्सचे प्रतिनिधित्व केले.

देशाच्या कानाकोपऱ्यातील खेळाडूंचा समावेश असलेल्या चेन्नई सिंगम्स संघाने सुमीत ढेकळेला 19 लाखांना विकत घेतले. सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये तो संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर चेन्नईने केतन म्हात्रेला 16.5 लाख, फरमान खानला 10.5 लाख, दिलीप बिंजवा यांना 9 लाखांना विकत घेतले. संजय कनोजियाला 7 लाख, सागर अलीला 4.4 लाख, हरीश परमार, वेदांत मयेकर, पंकज पटेल, फरहत अहमद, आर. थाविथ कुमार, व्यंकटचलपती विघ्नेश, अनिकेत सानप, बबलू पाटील, राजदीप जडेजा आणि विश्वनाथ जाधव यांना प्रत्येकी 3 लाख रुपये मोजून करारबद्ध केले. पश्चिम विभागातील 6 खेळाडू आणि पूर्व, उत्तर, दक्षिण, मध्य विभागातील प्रत्येकी दोन खेळाडूंसह 19 वर्षांखालील श्रेणीतील खेळाडूंवर चेन्नई सिंगम्सची ताकद आहे.

विभागवार (झोन) खेळाडू –

पूर्व विभाग 

सागर अली – डावखुरा फलंदाज
संजय कनोजिया – डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज

उत्तर विभाग

फरमान खान – उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
फरहत अहमद – उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज

दक्षिण विभाग

आर. थाविथ कुमार – अष्टपैलू आणि डावखुरा वेगवान गोलंदाज
वेंकटचलपती विघ्नेश – अष्टपैलू आणि उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज

मध्य विभाग

दिलीप बिंजवा – अष्टपैलू आणि डावखुरा मध्यमगती गोलंदाज
पंकज पटेल – डावखुरा मध्यमगती गोलंदाज
पश्चिम विभाग
सुमीत ढेकळे – डावखुरा फलंदाज
बबलू पाटील – अष्टपैलू
केतन म्हात्रे – उजव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज
अनिकेत सानप – डावखुरा फिरकी गोलंदाज
राजदीप जडेजा – उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
विश्वनाथ जाधव – अष्टपैलू आणि उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज

19 वर्षांखालील गटात पश्चिम विभागातील वेदांत मयेकर (18 वर्षीय) आणि हरीश परमारला (19 वर्षीय) चेन्नई सिंगम्स संघात समाविष्ट करण्यात आले.

वेदांत मयेकर – अष्टपैलू आणि उजव्या हाताचा वेगवान
हरीश परमार – अष्टपैलू आणि उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज