टोकयो – तटरक्षक दलाच्या विमानावर धडकल्यानंतर प्रवासी विमानाने घेतला पेट, पाच जणांचा मृत्यू

टोकियोच्या हनेडा विमानतळावर जपान एअरलाईन्सच्या प्रवासी विमानाची व तटरक्षक दलाच्या विमानाची जोरदार धडक झाली. या धडकेत प्रवासी विमानाने पेट घेतला. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण विमानाला आग लागली.सुदैवाने जपान एअरलाईन्सच्या विमानातील सर्व प्रवासी व क्रू मेंबर्स सुरक्षित बाहेर आले. मात्र तटरक्षक दलाच्या विमानातील पाच क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

टोकियोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या या दुर्घटनेचा व्हिडिओ समोर असून यावरुन विमानातील आग किती भीषण होती ते दिसून येत आहे. विमानाला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 70 गाड्या आल्या होत्या. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. या दुर्घटनेत तटरक्षक दलाच्या विमानाचेही मोठे नुकसान झाले असून त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला.

एनएचकेने या घटनेचा व्हिडीओचे फुटेज जारी केले आहे. अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे या घटनेच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, किती लोक जखमी झाले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही.