अभियंत्यावर शाईफेक प्रकरणात पाच जणांना न्यायालयीन कोठडी

मुंबई महानगरपालिकेच्या एम/पूर्व कार्यालयात आंदोलनप्रसंगी कार्यकारी अभियंता अनिल जाधव यांच्यावर शाईफेक केल्याच्या निषेधार्थ म्युनिसिपल मजदूर युनियन आणि म्युनिसिपल इंजिनीयर्स असोसिएशनच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. कार्यकारी अभियंत्यांवर शाईफेक करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आल्यानंतर भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याची माहिती कामगार संघटनांकडून आज देण्यात आली.

मुंबई काँग्रेसच्या वतीने एम पूर्व वॉर्डवर शनिवारी धडक मोर्चा काढण्यात आला. रस्त्यावरील कचरा, खड्ड्य़ांमुळे झालेली वाताहत, पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार – डेंग्यू, मलेरिया, कॉलरा या आजारांना नियंत्रणात ठेवण्यात आलेले प्रशासनाला अपयश यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळी पालिका अभियंता अनिल जाधव (52) यांच्यावर संतप्त आंदोलकांनी शाई फेकली व धमकावल्याचा आरोप कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ म्युनिसिपल मजदूर युनियन आणि म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनच्या वतीने एम वॉर्डवर मोर्चा काढून या प्रकाराचा निषेध करण्यात आल्याची माहिती कामगार संघटनांकडून देण्यात आली. या वेळी म्युनिसिपल इंजिनीयर्स असोसिएशनचे अध्यक्ष महाबळ शेट्टी, उपाध्यक्ष रमेश भुतेकर, म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव उपस्थित होते. अशा प्रकारचे गुन्हे अजामिनपात्र ठरविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देण्यासाठी विनंती करण्यात आली होती. पालिका आयुक्तांकडून राज्य शासनास तसा प्रस्तावही देण्यात आला आहे. असे गुन्हे अजामिनपात्र ठरल्यास असे प्रकार वारंवार होणार नाहीत, असे महाबळ शेट्टी म्हणाले. आगामी काळात पालिकेच्या निवडणुका होणार असल्याने आपल्या पक्षाचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी असे प्रकार होत असल्याचा आरोप अशोक जाधव यांनी केला. पालिकेच्या कर्मचारी-अभियंत्यांना अशा प्रकारांपासून संरक्षण देण्यासाठी डॉक्टरांप्रमाणे कायद्याचे संरक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत पालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.