विमुक्ता – मानवहित हेच खरे संशोधन

>> डॉ. ज्योती धर्माधिकारी

मनुष्य जात नष्ट होण्याच्या उंबरठय़ावर उभी असताना अत्यंत वेगवान संशोधन आणि त्याच वेगाने जवळ जवळ 30 अब्ज लसींची निर्मिती ही बाब चमत्काराच्याही पलीकडची आहे. हा चमत्कार करण्यामागे मूलभूत संशोधन करणारी शास्त्रज्ञ कॅटलिन कॅरिको यंदाच्या नोबेल पारितोषिकाची मानकरी ठरली. समर्पित संशोधन आणि संपूर्ण आयुष्य झपाटल्यागत जगणे, त्यासाठी अथक, अविश्रांत कष्ट घेणे व जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हेच कॅटलिन यांच्या आयुष्याचे रहस्य आहे. मानव कल्याणकारी काम करणाऱया अनेक लोकांच्या नामावलीमध्ये अब्जावधी लोकांचे जीव वाचवणाऱया कॅटलिना कॅरिको यांचे मूलभूत संशोधन हे मानवी इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे.

नुकतेच 2 ऑक्टोबरला वैद्यकीय किंवा शरीरशास्त्र क्षेत्रातले नोबेल पारितोषिक जाहीर झाले. हे पारितोषिक कोविडच्या संदर्भात मूलभूत संशोधन करणाऱया शास्त्रज्ञांना मिळणार हे निर्विवाद होते. मनुष्य जात नष्ट होण्याच्या उंबरठय़ावर उभी असताना अत्यंत वेगवान संशोधन आणि त्याच वेगाने जवळ जवळ 30 अब्ज लसींची निर्मिती ही बाब चमत्काराच्याही पलीकडची आहे. हा चमत्कार करण्यामागे मूलभूत संशोधन करणारे दोन शास्त्रज्ञ कॅटलिन कॅरिको (हंगेरियन- अमेरिकन) आणि ड्रू वेईसमन (अमेरिकन) यंदाच्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरले.

जगातला सर्वोच्च पुरस्कार कॅटीला मिळाल्याची बातमी तिला फोनवर सांगण्यात आली. यावर केटी सहज म्हणाली, ‘नोबेल पारितोषिक यंदा मलाच मिळणार याची मला नि:संशय खात्री होती.’ 1985 पासून ते आतापर्यंत ती करत असलेल्या अथक, अविश्रांत, श्रमाचे ते पारितोषिक आहे. 1990 ला तिने पहिल्यांदा हा रेणू तयार केला, पण त्या वेळी तिच्या संशोधनाची फारशी दखल कोणी घेतली नाही.

कॅटलिन कॅरिकोचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संशोधन… झपाटल्यागत संशोधन ती करत असे. प्रतिबंधात्मक रोगप्रतिकारशास्त्राचे सहा. प्राध्यापक ड्रू वेईसमन यांची 1997 मध्ये भेट झाली. दोघांचेही काम वेगळे असले तरी अंतिम परिणाम एकच होता तो म्हणजे रोगप्रतिबंधक लस तयार करणे. 2017 मध्ये त्यांना यश मिळाले आणि वैद्यकीय क्षेत्रात ाढांती झाली. सुरुवातीला 2005 ते 13 या संशोधक-द्वयींनी ‘आरएनए आरएक्स’ ही कंपनी स्थापन करून मुख्याधिकारी म्हणून काम केले.

केटी मूळची हंगेरियन नागरिक आहे. तिने जीव-रसायन शास्त्रज्ञ म्हणून तिच्या करीअरची सुरुवात झाली. सुरुवातीपासून तिच्या संशोधनाचा विषय आरएनए रेणू हाच होता. मग वैद्यकीय क्षेत्रातले तांत्रिक योगदान असेल, संदेश रेणू तयार करणे, प्रथिन विस्थापन चिकित्सा असेल अशा वेगवेगळय़ा संदर्भामध्ये केटी काम करत होती. केटीचा जन्म (17 जानेवारी 1955) हंगेरीमधल्या एका छोटय़ाशा गावी झाला. प्राथमिक शाळेपासूनच केटीचे विज्ञानाचे ज्ञान अफलातून होते. तिने सातत्याने जीवशास्त्राचा अभ्यास केला. 1978 मध्ये विज्ञानामध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर 1982 मध्ये जैव-रसायनशास्त्र या विषयात संशोधन पूर्ण केले. संशोधनालाच पूर्ण आयुष्य अर्पण केल्यामुळे तिने डॉक्टरेट मिळाल्यानंतरही संशोधन ‘बायोलॉजिकल रिसर्च सेंटर, हंगेरी’ येथे सुरू ठेवले. हंगेरियन कॅनडियन लेखक हंशवा यांच्या पुस्तकातला एक संदेश तिच्या मनावर कोरला गेला, ‘जे बदल तुम्ही करू शकता, अशा बदलांवर तुम्ही तुमचे मन केंद्रित करा…’ आणि त्यात कॅटलिनाचे तर जैव-रसायनशास्त्रामध्ये संशोधन करायचे ठरलेले होते. या संदेशाने तिचे आयुष्य घडवले. केटीची मुलगी सुसान फ्रान्शिया एक ऑलिंपिक जगतज्जेता आहे.

सुरुवातीला केटीने टेम्पल विद्यापीठ, फिलाडेल्फिया (1982) येथे संशोधन विद्यार्थिनी म्हणून काम केले तसेच विविध रोगांच्या वैद्यकीय चाचणीसाठीही काम केले. या वेळी पहिल्यांदा द्वी-मानक आरएनए उपचार पद्धती राबवली. ही पहिलीच उपचार प्रािढया होती. मात्र 1997 मध्ये पेनिसलेविया विद्यापीठामध्ये तिला अनुदान नाकारण्यात आले.
कोणतीही लस बनवण्यासाठी संदेश-आरएनए वापरण्यात येतात हे एम- आरएनए सुरुवातीला उंदरांवर वापरले गेले तेव्हा दाहक परिणाम दिसून आला नाही. मात्र माणसावर वापरल्यावर वेगवेगळय़ा प्रकारची दाहक लक्षणे दिसून आली. रोगप्रतिकारक शक्ती वाढत असताना शरीर त्या रोगासाठी प्रतिबंधक यंत्रणा तयार करत असताना शरीराकडून विरोध होतो असा त्याचा अर्थ आहे. केटीने पहिल्यांदा आरएनए रेणू तयार करताना तो विकसित करण्याचे ठरवले. विकसित एमआरएनएच्या प्रजाती विविध रोगांसाठी वापरून बघितल्यावर जवळ जवळ शून्य शारीरिक दाहकता दिसून आली, तेव्हा हे संशोधन जाहीर केले गेले. 2005 मध्ये ‘इम्युनिटी’ मासिकाने हे लेख छापले आणि केटीचे संशोधन महत्त्वपूर्ण ठरले. त्यानंतरच ड्रू वेईसमन आणि केटी कॅरिको यांनी स्वतच्या नावाने पेटंट घेतले. पुढे विद्यापीठाने या दोघांचे पेटंट मोडर्ना या जर्मन कंपनीला विकले. आता आपल्याला पुढे भविष्यच नाही असे केटीला वाटू लागले, पण तिच्या पतीने, बेल फ्रान्शिया यांनी तिला उमेद दिली. 2013 मध्ये केटी कॅरिको जर्मनीमध्ये गेली. बायोइंटेक या कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून काम स्वीकारले आणि त्याच ठिकाणी सातत्याने संशोधन केले. 2017 मध्ये विकसित संदेश आरएनए तयार झाला. या एम-आरएनएमुळे सार्स, मार्स या साथरोगावर प्रतिबंध लस तयार करण्यात आली. 2019 मध्ये कोविड आला आणि लस करण्यासाठी विकसित आरएनएचा परिणामकारक उपयोग झाला. बायोइंटेकने अल्पावधीत कोविडची लस निर्माण केली. जून 2020 मध्ये बायोइंटेक कंपनीने 15 अब्ज लोकांना लसीकरण केले, नोबेल या सर्वोच्च पुरस्काराच्या आधी केटीवर गेल्या तीन वर्षांमध्ये पुरस्कारांचा अक्षरश वर्षाव होत आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची एखादी छोटीशी पुस्तिकाही प्रसिद्ध होऊ शकेल एवढी जगमान्यता त्यांना मिळाली. विविध विद्यापीठांनी त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान केली. समर्पित संशोधन आणि संपूर्ण आयुष्य झपाटल्यागत जगणे, त्यासाठी अथक, अविश्रांत कष्ट घेणे व जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हेच कॅटलिना यांच्या आयुष्याचे रहस्य आहे. एका विलक्षण झपाटलेल्या शास्त्रज्ञ बाईचा हा जीवन प्रवास त्यांना प्रसिद्धीच्या, श्रीमंतीच्या सर्वोत्कृष्ट पदावर नेऊन ठेवतो. अर्थात, संशोधन हेच त्यांचे एकमेव ध्येय होते.

[email protected]

(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागप्रमुख आहेत)