कारगीलमधील उंचावरील धावपट्टीवर रात्रीच्या अंधारातील थरार, सी-130 लष्करी मालवाहू विमानाचे यशस्वी लँडिंग

लष्करी कारवाईसाठी मोलाची मदत करणारे सी-130 सुपर हर्क्युलस वाहतूक विमान हिंदुस्थानी हवाई दलाने अतिउंचावरील कारगीलमध्ये नियंत्रण रेषेजवळ बांधण्यात आलेल्या धावपट्टीवर रात्रीच्या अंधारात यशस्वीपणे उतरवले.

सैन्याची तुकडी, लष्करी वाहनांची वाहतूक करू शकणारे सुपर हर्क्युलस विमान अशा प्रकारे प्रथमच रात्रीच्या अंधारात पाकिस्तानच्या सीमेलगत उतरवण्यात आले आहे. लडाख केंद्रशासित प्रदेशातील कारगीलमधील ही अतिउंचावरील धावपट्टी 10,500 फूट उंचीवर आहे. हा परिसर उंच टेकडय़ा आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. अशा परिस्थितीत येथे विमान उतरवणे अत्यंत अवघड मानले जाते. त्यातही रात्रीच्या अंधारात उतरणे आणखी आव्हानात्मक आहे. आपल्या हवाई दलाने ही कामगिरी फत्ते केली आहे.

या विमानात प्रशिक्षित गरुड कमांडोंचे पथकही होते. या कमांडो पथकाची एक सराव मोहीमही या विमानाच्या लँडिंगनंतर पार पडली. हवाई दलाची विमाने याआधीही उतरवण्यात आली असली तरी एखाद्या मालवाहू विमानाने रात्री धावपट्टीवर उतरण्याची ही पहिलीच वेळ होती.

अतिउंचावरील धावपट्टय़ांसाठी विशेष सुविधा
अतिउंचावर सीमेजवळील धावपट्टय़ा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनेही पावले उचलण्यात येत आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ 16,700 फुटांवरील दौलत बेग ओल्डी धावपट्टी ही जगातील सर्वाधिक उंचावरील धावपट्टी मानली जाते. दौलत बेग आणि 13 हजार फुटांवरील न्योमा धावपट्टी तळावरील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विशेषत्वाने लक्ष पुरवण्यात येत आहे.

सी-130जे विमानाची वैशिष्टय़े
हे सुपर हर्क्युलस विमान एका फेरीत 19 टन सामान एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी नेऊ शकते. हे विमान एका तासात 644 किमी अंतर पार करू शकते. पूर्ण तयार नसलेल्या आणि अपुऱया धावपट्टीवरूनही या विमानाचे उड्डाण आणि अवतरण शक्य आहे. सीमावर्ती दुर्गम वा उंचावरील भागात लष्कराला युद्धकाळात सामान पोहोचवण्यासाठी हे विमान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.