शिवसेनेला कामगारशक्तीचे बळ, 25 लाख सदस्य असलेल्या कामगार कर्मचारी कृती समितीचा पाठिंबा

शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांबरोबरच समाजाच्या विविध स्तरांतील घटकांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा मिळत आहे. सुमारे 25 लाख सभासद असलेल्या कामगार कर्मचारी संघटना कृती समितीने आज शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला.

कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱयांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राज्यातील संघटित व असंघटित कामगार आणि कर्मचाऱयांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. 15 मागण्यांचे निवेदन यावेळी उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. कामगार कर्मचाऱयांच्या प्रश्नांना शिवसेना निश्चितच न्याय देईल, असे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.

कृती समितीचे प्रमुख समन्वयक डॉ. डी. एल. कराड, ज्येष्ठ नेते एम. ए. पाटील, निवृत्ती धुमाळ, गोविंदराव मोहिते, संतोष चाळके, कृष्णा भोयर, विवेक माँटेरो, उदय भट, विजय कुलकर्णी, अशोक जाधव, बबली रावत, मुकेश तिघोटे, सुनील बोरकर आदी याप्रसंगी उपस्थित होते. कृती समितीचे 25 लाख सभासद व त्यांचे कुटुंबीय भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांचा पराभव करण्यासाठी व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, असे आश्वासन यावेळी कृती समितीच्या वतीने देण्यात आले.

कृती समितीच्या प्रमुख मागण्या…

– मोदी सरकारने मंजूर केलेल्या कामगारविरोधी चार श्रम संहिता रद्द कराव्यात व पूर्वीचे 29 कामगार कायदे पुन्हा लागू करावेत
– कायद्याने दरमहा 26 हजार रुपये किमान वेतन निश्चित करावे
– पंत्राटी कामगारांना कायम करावे
– कामगारविषयक त्रिपक्षीय समिती गठीत करून त्यावर कामगार संघटनांचे प्रतिनिधी घ्यावेत
– ईपीएफ पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये वाढ करावी, सार्वजनिक उद्योग व सेवांचे खासगीकरण आणि विक्रीचे धोरण रद्द करावे
– शिक्षण व आरोग्यसेवाचे खासगीकरण बंद करावे,
– गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्यावीत
– बेस्ट सेवा व राज्य परिवहन सेवा मजबूत करण्यासाठी सरकारने सहकार्य करावे.