आज शेवटचा दिवस! दुकाने-आस्थापनांवर मराठी पाट्या लावा अन्यथा मंगळवारपासून कारवाईचा बडगा

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बृहन्‍मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात पाट्या लावणे बंधनकारक आहे. यासाठी सर्व 24 वॉर्डमध्ये इन्स्पेक्टरसह सहाय्यकांच्या माध्यमातून तपासणी करून कारवाई केली जाईल. यामध्ये दुकाने-आस्थापनांवर मराठी पाटी नसल्यास प्रति कामगार 2 हजार रुपये याप्रमाणे दंड वसूल केला जाणार आहे.

रविवार आणि सोमवार (गुरू नानक जयंती) सुट्टी असल्याने 28 नोव्हेंबर, 2023 पासून कारवाईला सुरुवात होईल. विशेष म्हणजे कारवाईआधी कोणतीही नोटीस दिली जाणार नसल्याने दुकानदारांना तातडीने मराठी पाट्या लावाव्या लागणार आहेत. या कारवाईत सात लाख दुकाने-आस्थापना पालिकेच्या रडारवर आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी बैठक घेऊन सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी आणि उप आयुक्‍त (विशेष) संजोग कबरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करिता विभाग स्तरावर दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्‍ठ सुविधाकार व सुविधाकारांचे पथक गठीत करण्यात आले आहे.ृ

या कारवाई दरम्यान ज्या दुकाने व आस्थापनांनी अधिनियमांची तरतुद व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मराठी पाट्या देवनागरी लिपित ठळक अक्षरात लावले नसल्यास अश्या दुकाने व आस्थापना मालकांवर अधिनियमातील तरतुदीनुसार न्यायालयीन कार्यवाही करण्यात येईल. तसेच ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनामार्फत स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, 2018 व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, 2022 च्या अनुक्रमे नियम 35 व कलम 36 क च्या तरतुदींनुसार आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिका (एस) सिव्हील क्र.(5) 775/2022 बाबत 25 सप्‍टेंबर 2023 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्‍यांना दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात लावण्याबाबत दोन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत 25 नोव्‍हेंबर 2023 रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे सदर मुदतीत दुकाने व आस्थापनांनी मराठी पाट्या न लावल्यास मंगळवार 28 नोव्हेंबरपासून कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

अशी होणार कारवाई

– दुकाने-आस्थापनांवर मराठी नामफलक लावण्याची कार्यवाही होत असल्याबाबतची तपासणी पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाकडून प्रत्येक वॉर्डमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी 75 इन्स्पेक्टर आहेत. शिवाय त्यांच्या सोबत एक सुविधाकारही राहील.
– यावेळी मराठी पाटी लावण्यास नकार दिल्यास न्यायालयात खटला दाखल केला जाईल. न्यायालयीन कारवाई नको असल्यास दंड भरावा लागेल. यामध्ये एका कामगारामागे दोन हजार रुपये दंड भरावा लागेल.