कश्मीरसंबंधी विधेयकांना लोकसभेची मंजुरी

जम्मू-कश्मीर पुनर्गठन व जम्मू-कश्मीर आरक्षण विधेयकाला गुरुवारी लोकसभेने आवाजी मतदानाने मंजुरी दिली. या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी नेहरूंच्या घोडचुकांचे जुनेच तुणतुणे वाजवल्यामुळे गदारोळ झाला होता. राज्यसभेत गुरुवारी हे विधेयक गृहमंत्र्यांनी मांडले असून तिथे चर्चा व मतदानानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यावर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.

फक्त मोदीच म्हणा!

नरेंद्र मोदी किंवा नुसते मोदी म्हणून जनतेने मला स्वीकारले आणि पुकारलेले आहे. तुम्हीदेखील मला मोदीजी म्हणू नका, आदरणीय मोदीजी वगैरे पण न म्हणता फक्त नरेंद्र मोदी किंवा मोदी या नावानेच मला संबोधित करा, असा मानभावीपणा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांसमोर दाखवला. विधानसभा निवडणुकांनंतर संसद भवनात मोदी भाजप खासदारांच्या बैठकीत येताच अर्थातच अपेक्षेप्रमाणे मोदी… मोदी असा जयघोष झाला.

गिरीराज सिंह यांच्या विरोधात निदर्शने

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल भाजप नेते व पेंद्रीय मंत्री गिरीराजसिंग यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीच्या निषेधार्थ तृणमूलच्या महिला खासदारांनी गुरुवारी संसद भवनातील महात्मा गांधींच्या पुतळय़ाजवळ आंदोलन केले.

भाजप खासदार रमेश बिधुडींनी मागितली माफी

बसपा खासदार पुंवर दानीश अली यांना संसदेच्या भर सभागृहात जातीवाचक शब्द वापरत शिव्या हासडल्याप्रकरणी तब्बल अडीच महिन्यांनंतर भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांनी अखेर माफी मागितली आहे. सप्टेंबरमध्ये लोकसभेत ‘चांद्रयान’वर चर्चा सुरू असताना बिधुडी यांनी दानीश अली यांना उद्देशून आक्षेपार्ह विधान केले होते.

बाबा बालकनाथ यांचा राजीनामा

राजस्थानच्या तिजारा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले लोकसभा सदस्य बाबा बालकनाथ यांनी आज लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत बालकनाथ यांचे नाव आघाडीवर आहे.

लिव्ह इन रिलेशनशिपला भाजप खासदाराचा विरोध

विवाहाशिवाय लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणे हा घातक आजार असून समाजातून त्याचे निर्मूलन करण्यासाठी सरकारने कायदा बनवावा, अशी मागणी लोकसभेत भाजप खासदार धरमबीर सिंग यांनी केली. प्रेमविवाहांमध्ये घटस्पह्टांचे प्रमाण मोठे असून, त्यामुळे अशा विवाहांसाठी वधू आणि वराच्या मातापित्यांची संमती सक्तीची करावी, असेही ते म्हणाले.