गोविंदा खोटारडा, त्याच्याशी मैत्री होऊ शकत नाही

गोविंदा यांच्यासोबत माझा परिचय आहे. पण मी त्यांना कधीच मित्र म्हणू शकणार नाही. गोविंदा खोटारडा माणूस आहे. मी राजकारण सोडले आहे. मी राजकारणात जाणार नाही, असे त्याने एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा सांगितले. त्यानंतर ते पुन्हा राजकारणात आले. त्यामुळे ते खोटे बोलत असल्याचे मला वाटतेय, असा टोला भाजप नेते राम नाईक यांनी लगावला.

अभिनेते गोविंदा यांनी गुरुवारी शिंदे गटात प्रवेश करत दुसरी राजकीय इनिंग सुरू केली. 14 वर्षांपूर्वी गोविंदा यांनी भाजप नेते राम नाईक यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करत काँग्रेसमधून राजकीय श्रीगणेशा केला होता. गोविंदा यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राम नाईक यांनी गोविंदा यांना मी कधीच मित्र म्हणू शकणार नसल्याचे सांगितले.

राजकारणात जरतर असे काही नसते. होय किंवा नाही या दोन शब्दांतच सर्व काम करायचे असते. गोविंदा खोटे बोलतात की काय अशी रुखरुख माझ्या मनात कायम आहे, असे राम नाईक गोविंदा यांच्या राजकारणातील पुनर्प्रवेशाबाबत बोलताना म्हणाले.

दाऊदशी संबंधावर ठाम

गोविंदा यांनी निवडणुकीत दाऊदची मदत घेतल्याच्या आरोपावर आपण आजही ठाम आहोत, असे राम नाईक म्हणाले. गोविंदा यांनी माझे आरोप फेटाळून लावले नाहीत किंवा त्याला चॅलेंजही केले नाही. त्यांचे कोणी मित्रही इतक्या वर्षांत आरोप खोडून काढायला पुढे आले नाहीत. माझ्या पुस्तकात मी या आरोपाचा उल्लेख केला आहे. पुस्तक प्रकाशित होऊन सात-आठ वर्षेही झाली आहेत. इतक्या वर्षांत ते काहीच बोलले नाहीत, असे राम नाईक म्हणाले.