निवडणूक प्रचारात विद्यार्थी; शाळा संचालकांवर कारवाई पण गडकरींवर कारवाई कधी? काँग्रेसचा प्रशासनाला सवाल

नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारसभेत शाळकरी मुलांचा उपयोग करून आचारसंहितेचा भंग केला. या मुद्दय़ावरून नागपूरमधील एनएसव्हीएम फुलवारी शाळेच्या संचालकांवर कारवाई करण्यात आली. पण भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्यावर कारवाई कधी करणार, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

 नागपूरच्या वैशाली नगरमध्ये 1 एप्रिल रोजी नितीन गडकरी यांच्या प्रचार रॅलीत फुलवारी शाळेच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले होते. वास्तविक निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करू नये असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आचारसंहिता भंग केल्याच्या मुद्दय़ावरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने शाळेच्या संचालकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. या कारवाईचे अतुल लोंढे यांनी स्वागत केले आहे. पण शाळकरी मुलांना प्रचारासाठी बोलावणारे व त्यासाठी शाळेवर दबाव टाकणारे नितीन गडकरी आणि भाजपवर काहीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणात त्यामुळे नितीन गडकरी यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली.