नांदेड, परभणी, हिंगोलीसह बुलढाण्यातील प्रचार थांबला; दुसर्‍या टप्प्यात 13 राज्यांतील 89 मतदारसंघांत होणार मतदान

मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणीसह विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम या मतदारासंघातील प्रचाराच्या तोफा बुधवारी थंडावल्या. या मतदारसंघांमध्ये शुक्रवार, 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून, त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

देशभरातील मतदानाचा दुसरा टप्पा 26 एप्रिल रोजी पार पडत असून 13 राज्यांतील 89 मतदारसंघांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या मतदारसंघांतील प्रचार आज संपला. बुलढाण्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून, आता उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर दिला आहे.

नांदेड मतदारसंघात महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण आणि भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात थेट लढत आहे. हिंगोलीत महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर आणि मिंधे गटाचे बाबुराव कदम कोहळीकर यांच्यात लढाई होत असून परभणीत महाविकास आघाडीचे संजय जाधव आणि रासपचे महादेव जानकर यांच्यात थेट सामना आहे. बुलढाण्यात महाविकास आघाडीचे प्रा. नरेंद्र खेडेकर, मिंधे गटाचे प्रतापराव जाधव आणि अपक्ष रविकांत तुपकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

केरळातील 20, कर्नाटकातील 14, राजस्थानातील 13, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी आठ तर मध्य प्रदेशातील सात, आसाम, बिहारमध्ये प्रत्येकी सात, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी तीन तसेच जम्मू-कश्मीर, मणिपूर आणि त्रिपुरातील प्रत्येकी एक जागेवरील प्रचार आज थांबला.