माढय़ाचा तिढा सुटेना, भाजपसमोर दबाव वाढला; भाजपच्या कट्टर कार्यकर्त्याचे देवेंद्र फडणवीसांना रक्ताने पत्र

माढा लोकसभा मतदारसंघातील तिढा अजूनही सुटलेला नाही. विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा तिकीट दिल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. निंबाळकरांना बदलून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपवर दबाव वाढला आहे. एका तरुणाने तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहून तशी मागणी केल्याने आता फडणवीसांसमोरही धर्मसंकट उभे राहिले आहे.

रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून माढय़ातील वातावरण तापले आहे. अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील माढय़ातील उमेदवारीसाठी अडून बसले आहेत. त्यांची समजूत काढण्याचे भाजपचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत.
धैर्यशील मोहिते पाटलांना तिकीट द्या यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांचा भाजपवर प्रचंड दबाव आहे. भाजपने उमेदवारी दिली नाही तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार यांची तुतारी हातात घ्यावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनीही माढय़ातील उमेदवार बदलला नाही तर कार्यकर्ते भाजपचा प्रचार करणार नाहीत असे जाहीर संकेत मध्यंतरी दिले होते.

पंढरपूरच्या धोंडेवाडी येथील भाजपचे कट्टर कार्यकर्ते महेश लोखंडे यांनी मोहिते पाटलांसाठी फडणवीसांना रक्ताने पत्र लिहिले आहे. रणजितसिंह निंबाळकर हे लोकांच्या संपर्कात नसल्याने पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत. त्यामुळे निंबाळकरांची उमेदवारी रद्द करून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.