माद्रिद मास्टर्स बॅडमिंटन – सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने माद्रिद स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत चिनी तैपेईच्या हुआंग यू-हसुन हिला सरळ गेममध्ये पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या लढतीत PV Sindhu हिने पूर्णपणे वर्चस्व राखले. तिला जागतिक क्रमवारीत 63 व्या स्थानावर असलेल्या हुआंगकडून कोणतेही आव्हान मिळाले नाही. माजी जगज्जेत्या सिंधूने 36 मिनिटांच्या लढतीत 21-14, 21-12 असा विजय मिळवला.

मागील सत्रातील उपविजेत्या सिंधूसमोर आता थायलंडच्या सहाव्या मानांकित सुपानिदा केटथोंग किंवा जपानच्या नात्सुकी निदाइरा यापैकी एकीचे आव्हान असेल. सिंधूने सुरुवातीच्या गेममध्ये 3-0 अशी आघाडी घेतली, पण त्यानंतर तिने आघाडी गमावली. सतत जाळीजवळ खेळल्यामुळे तिची आघाडी कमी होऊन 7-6 अशी झाली. सिंधूने त्यानंतर खेळ उंचावताना हुआंगच्या चुकांचा फायदा घएत 18-12 अशी आघाडी वाढवली. सिंधूने त्यानंतर आठ गेम पॉइंट मिळवले आणि पहिला गेम जिंकला. दुसऱया गेममध्ये हुआंगने संघर्ष सुरूच ठेवला. तिच्याजवळ सिंधूच्या जोरदार फटक्यांना काहीही उत्तर नव्हते. हुआंगने ड्रॉप शॉट, प्लेसमेंटचा वापर केला, पण ती सिंधूला अडचणीत आणू शकली नाही. या गेममध्ये सिंधूने आठ गुण मिळवले आणि हुआंगच्या चुकीचा फायदा घेत सामना जिंकला.

गेल्या आठवडय़ात ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप आणि स्वीस ओपनचे विजेतेपद पटकावणारी स्पेनची पॅरोलिना मारिन स्पर्धेबाहेर झाल्यामुळे सिंधूला विजेतेपदाची संधी आहे. सिंधूने बीडब्ल्यूएफ टूरमध्ये अखेरचे विजेतेपद 2022 सिंगापूर ओपनमध्ये जिंकले होते.