राष्ट्रवादीकडून बंडखोरांवर कारवाईस सुरुवात; दोन बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून बंडखोरांवर कारवाईला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांना बडतर्फ करण्यात आले आहे. राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित राहिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच कोला शहर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांच्यावरही बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री, तसेच मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी 2 जुलै 2023 रोजी शिवाजीराव गर्जे आणि विजय देशमुख उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह इ. वापर करू नये. अन्यथा आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही दोघांना देण्यात आला आहे.

9 आमदार वगळता बाकीच्या आमदारांना पक्षाची दारे खुली!

अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार शरद पवार आणि मला संपर्क करत आहे. त्यांनी सांगितले आहे की त्यांना धोक्याने तिथे नेले होते. ज्या 9 आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पहिला मोहरा परत..! मी साहेबांसोबत.!! अमोल कोल्हेंचे ट्विट, अजित पवारांना पहिला धक्का

5 जुलैला बैठक

येत्या 5 जुलै रोजी शरद पवार यांनी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. या बैठकीला प्रचंड गर्दी होईल अशी खात्री व्यक्त करतानाच पवारांसोबत असणारा, पवारांना पाठिंबा देणारा प्रत्येक वर्ग तिथे सहभागी असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात उलथापालथ करणाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही; शरद पवारांनी ठणकावलं

काँग्रेसशी संघर्ष करायचा नाही

आम्हाला काँग्रेसशी कोणताही संघर्ष करायचा नाही. 9 आमदार सोडले तर सर्व आमदार अद्याप आमच्यासोबत आहेत. विधानसभा अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. यासाठी काही दिवस थांबावे लागेल असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले. ज्याक्षणी 9 आमदारांनी शपथ घेतली त्याचक्षणी ते अपात्र ठरत आहेत. विधानसभा अध्यक्षांना आम्ही तसे पत्र दिले आहे. त्यांचीशी बोलणेही झाले आहे. ते लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

तारीख, वेळ अन् ठिकाणही ठरलं! अजित पवार-शरद पवार येणार आमनेसामने