पहिला मोहरा परत..! मी साहेबांसोबत.!! अमोल कोल्हेंचे ट्विट, अजित पवारांना पहिला धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून अजित पवार यांच्यासह आमदारांच्या एका गटाने बंड केले आहे. बंड केलेला गट थेट सत्तेत सहभागी झाला असून रविवारी अजित पवार यांनी राजभवन येथे उपमुख्यमंत्री, तर 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे अनेक आमदार, खासदार उपस्थित होते. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात होता. मात्र या शपथविधीला उपस्थित असणारे काही आमदार, खासदार पुन्हा शरद पवारांसोबत आले आहेत. यात खासदार अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे.

राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्याला शिरूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेताना आणि त्यांच्या पाया पडतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची साथ सोडल्याची चर्चा सुरू होती. मात्र सोमवारी दुपारी सोशल मीडियाद्वारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. याला त्यांनी एक कॅप्शनही दिले आहे. टजेव्हा कधी मन आणि अंतःकरणात युद्ध होते तेव्हा आपल्या हृदयाचे ऐका. कदाचित मन कधी कधी नैतिकता विसरते… पण हृदय कधीच विसरत नाही, असे कॅप्शन कोल्हे यांनी दिले आहे. सोबत #मी_साहेबांसोबत हा हॅशटॅग वापरत आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले. तसेच ते उद्या शरद पवार यांची मुंबईत भेट घेणार असल्याचेही वृत्त आहे.

अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांच्या गाडीत, 24 तासांत बंडोबांची ‘घरवापसी’

पहिला मोहरा परत

दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी रिट्विट केले आहे. पहिला मोहरा परत आल्याचे त्यांनी म्हटले आहे.