…म्हणूनच महाराष्ट्र शरद पवारांचे नेतृत्व मानतो; अमित शहांवर जयंत पाटलांचा पलटवार

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांचे महाराष्ट्रात दौरे सुरू झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जळगावात घेतलेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवारांना महाराष्ट्राची जनता गेल्या 50 वर्षांपासून सहन करत आहे, असे ते म्हणाले. आमित शहा यांच्या या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जबरदस्त पलटवार केला आहे.

महाराष्ट्राने शरद पवार यांचा शुन्यातून जग निर्माण करणारा प्रवास महाराष्ट्राने 50 वर्षात बघितला आहे. महाराष्ट्राने त्यांना साथ दिली. सहन करण्याचा कधीच प्रश्न उद्भवला नाही, त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जाती, धर्मांना बरोबर घेऊन राजकारण केले म्हणून त्यांना आज शरद पवार म्हणतात, असे सडेतोड प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी अमित शहा यांना दिले आहे. महाराष्ट्रातील सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून जनता शरद पवार यांना मानतात आणि पाठिंबा देतात. आजही ते सर्वांना हवेहवेसे वाटतात, असे जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्रात शरद पवारांची ताकद आणि प्रतिमा मोठी आहे. महाराष्ट्र त्यांनाच मानतो त्यामुळे अशाप्रकरची टीका होणे स्वभाविक आहे. शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना केलेले काम, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाचे काम तसेच किल्लारी येथे झालेल्या भूकंपानंतरचे काम महाराष्ट्र विसरलेला नाही, असेही पाटील म्हणाले.