अन्नधान्याची टंचाई भासणार, महागाईचा आगडोंब उसळणार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी कृषी उत्पादन

ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी म्हणजेच 0.46 लाख हेक्टर क्षेत्रावर केवळ 6.05 लाख मेट्रिक टन इतकेच कृषी उत्पादन झाल्याचे कृषी विभागाच्या एका अहवालावरून उघड झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अन्नधान्याचा तुटवडा भासणार असून महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता असल्याचे कृषितज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान, यंदा राज्यभरातील तब्बल 446 महसूल मंडळात 21 दिवसांहून अधिक दिवस पाऊसच झाला नसल्याचेही अहवालात म्हटले आहे.

गेल्या वर्षी 8.08 लाख हेक्टर क्षेत्रावर 120.32 लाख हेक्टर इतके उत्पन्न झाले होते. यंदा खरीपाच्या हंगामात जुलै महिन्यात विदर्भात अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यानतंर ऑगस्ट महिन्यात थोडाफार पाऊस झाला. त्यात शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी-बियाणे खरेदी केली, मात्र ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने ओढ दिली आणि मोठय़ा प्रमाणावर पिके करपून गेली. यंदा 50 टक्क्यांहून अधिक पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट

राज्यभरात मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे कृषी आणि हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी म्हटले आहे. विशेषतः तरुणवर्ग आता शेतीकडे वळेनासा झाला आहे. तर अनेक शेतकरीही आपल्या मुलाबाळांना उच्चशिक्षण देऊन त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी करावी असे वाटत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी दिल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, यंदा कमी कृषी उत्पादन झाल्यामुळे अन्नधान्याची मोठय़ा प्रमाणावर टंचाई भासेल, असे किसान सभेचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले.

सप्टेंबरपर्यंत 15 जिल्ह्यांत केवळ 25 ते 50 टक्के पाऊस

जूनपासून सप्टेंबरपर्यंत तब्बल 15 जिल्हे आणि 31 तालुक्यांत केवळ 25 ते 50 टक्के पाऊस पडल्याचे कृषी विभागाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिह्यांचा समावेश आहे.

नगरमध्ये साडेबारा हजार हेक्टरवरील पिकांवर नांगर

गेल्या महिनाभरापासून पाऊस नसल्यामुळे नगर जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. पिकांना पाणी नसल्याने डोळ्यांदेखत करपून जाणारी पिके पाहण्यापेक्षा ती मोडलेली बरी, असा विचार करीत जिह्यातील साडेबारा हजार हेक्टरवरील पिकांवर शेतकऱ्यांनी ‘नांगर’ फिरवला आहे. कृषी विभागाने संकलित केलेल्या आकडेवारीवरून ही वास्तव परिस्थिती समोर आली आहे. पाऊस पडेल, या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांचा आता भ्रमनिरास झाला आहे. पावसाअभावी डोळ्यासमोर जळून जाणारी उभी पिके पाहत बसण्यापेक्षा शेतकऱ्यांकडून त्यावर नांगर फिरवला जात आहे. जिह्यात 12 हजार 300 हेक्टरवरील पिके शेतकऱ्यांनी मोडून टाकली आहेत.

2022 मध्ये सप्टेंबरपर्यंत 142.47 लाख हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणी
2023 मध्ये सप्टेंबरपर्यंत 140.70 लाख हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणी
राज्यात 1 जून ते 5 सप्टेंबर अखेरपर्यंत प्रत्यक्ष 697.5 मिमी म्हणजेच 82 टक्के पाऊस झाला

करपा रोगाने सिंधुदुर्गात भातशेती अडचणीत

सिंधुदुर्ग जिह्यातील पावसाळ्यातील प्रमुख पीक म्हणजे भात शेती. मात्र हीच भातशेती पाऊस नसल्याने अडचणीत सापडली आहे. पाण्या अभावी भात शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पावसाचा अनियमितपणा भात शेतीसाठी मारक ठरला असून पावसाविना भातशेती कोमेजून गेली आहे तर भात पिकांची उंची देखील खुंटली आहे. हिरवंगार दिसणारं शेत आता पिवळसर आणि करपून गेल्यासारखं दिसत आल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

यवतमाळमध्ये विष घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सततची नापिकी आणि वाढत चाललेला कर्जाचा डोंगर यामुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून यवतमाळ येथील एका शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना  मारेगाव तालुक्यातील शिवनाळा (तेलाई पोड) येथे घडली. केशव हनगू रामपुरे (50) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
रामपुरे यांनी साडेतीन एकरमध्ये कृषी उत्पादन घेतले होते. परंतु संपूर्ण ऑगस्ट पावसाविना कोरडा गेल्यामुळे त्यांनी पेरलेले सोयाबीन, तूर या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत होता. घर चालवायचे कसे आणि कर्जाचा डोंगर फेडायचा कसा या विवंचनेत गेल्या काही दिवसांपासून रामपुरे होते. अशातच दहा दिवसांपूर्वी त्यांनी घरातच आइसिकपॉवर नावाचे तणनाशक ग्रहण केले. त्यामुळे त्यांना तातडीने मारेगाव येथून चंद्रपूर येथे हलविण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना मूळ गावी आणण्यात आले. मात्र दोनच दिवसांपूर्वी पुन्हा प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले. येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.