मराठा तरुणाचा पोलिसांसमोरच पेट्रोल अंगावर टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न

‘एक मराठा लाख मराठा’ घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांसमोरच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करणार्‍या तरुणाचे पोलीस कर्मचारी चंद्रकांत माळी आणि पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांच्या प्रसंगावधानामुळे प्राण वाचले. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारच्या सुमारास हा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला.

सगेसोयरे अधिसूचनेच कायद्यात रूपांतरण करावे यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे ठाम आहेत. त्यातच ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानाकडे निघाले आहेत. याच वेळी जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्त कामी तैनात करण्यात आलेले पोलीस कर्मचारी चंद्रकांत माळी आणि पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ या तरुणाला ताब्यात घेतलं. त्याच्या हातातील पेट्रोलची बाटली आणि माचिस काढून घेतली. त्यानंतर समुपदेशनासाठी या तरुणाला तालुका जालना पोलीस ठाणे येथे नेण्यात आलं. मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ आज टळला.