आरक्षणाच्या बैठकीला फडणवीस आणि अजितदादा यांची दांडी, आमदार-खासदारांना धडकी; राजीनामासत्र सुरू

आरक्षणासाठी मराठा बांधव अत्यंत आक्रमक झाले आहेत. मराठय़ांचा संताप आता लोकप्रतिनिधींवर व्यक्त होऊ लागला आहे. आंदोलकांकडून आमदारांच्या घरांची जाळपोळ आणि कार्यालयांची तोडपह्ड होऊ लागली आहे. त्याची धडकीच सर्वपक्षीय आमदार-खासदारांनी घेतली असून मराठा आंदोलनाला पाठिंबा देत राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत दोन खासदार आणि दोन आमदारांनी आपले राजीनामे दिले आहेत. मराठा आंदोलकांनी घेराव घालताच रविवारी हिंगोली येथील खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा लिहून दिला होता. आज खासदार हेमंत गोडसे, कॉंग्रेसचे सुरेश वरपूडकर, बीडमधील गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी आपले राजीनामे दिले.

काही तरी घडतंय…

मुख्यमंत्री शिंदे रात्री अचानक राज्यपाल बैस यांच्या भेटीला दाखल झाले. त्यामुळे चर्चांना उधाण आले. छत्तीसगडमध्ये प्रचाराला गेलेले देवेंद्र फडणवीस घाईघाईत मुंबईत परतले. त्यांनी शिंदेंशी चर्चा केली. पोलीस महासंचालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली.

आंदोलक भरकटले म्हणणाऱ्या मिंधेंच्या विरोधात उद्रेक

मराठा आंदोलन भरकटत चालले म्हणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यवतमाळमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात विरोध झाला. आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला. या कार्यक्रमाच्या पोस्टरवरील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोंनाही काळे फासण्यात आले.