प्रासंगिक – मराठी भाषेसह बोलीभाषाही टिकवा!

>> स्नेहा अजित चव्हाण सहाय्यक शिक्षिका, श्रमिक विद्यालय, जोगेश्वरी (पूर्व)

मुले परकीय भाषा शिकत आहेत म्हणून मराठी भाषेला अधोगती आलेली आहे असे नाही. आपण आपली भाषा सांभाळायला कमी पडत आहोत असे मला वाटते. चला तर मग सुसंवाद करू या आपल्या मुलांशी आपल्या बोलीभाषेत. आपल्या मराठी भाषेसाठी आवश्यक तिथे आग्रही व्हा. कारण भाषा वापरली तरच ती टिकेल आणि आपली भाषा आपल्यालाच टिकवावी लागेल.

मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी, मराठी म्हणजे अवघा महाराष्ट्र. एखाद्या स्त्रीने साजशृंगार करावा अशी ही आपली मराठी भाषा नटलेली आहे. काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार सगळ्यांनी ती नटलेली आहे. शृंगार केल्यावर कपाळावर जसे पुंकू शोभून दिसतं तसा हा अनुस्वार शोभून दिसतो. मराठी ही अनेक संतांच्या कीर्तनांनी, ओव्यांनी, भारूड, भजनांनी सजली आहे. मराठी ही सर्वांगसुंदर भाषा आहे. माझ्या मराठी भाषेची काय वर्णाची थोरवी, दूर देशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी! खरं तर भाषा हे संवादाचे साधन आहे. एकमेकांशी बोलण्याचे, आपले विचार व्यक्त करण्याचे माध्यम आहे. आपल्या मेंदूची भाषा असते, आपल्या मनाची भाषा असते. आपण शांत असलो तरी आपण सतत स्वतःशी बोलत असतो आणि आपण जे स्वतःशी बोलतो ते आपल्या मातृभाषेतून बोलत असतो. ती आपल्या मनाची भाषा असते. तिच्याबद्दल आपल्याला गर्व आणि अभिमान असलाच पाहिजे.

मराठीमध्ये 52 बोलीभाषा आहेत. म्हणजे केवढी शब्दसंपदा आहे, पण त्यापैकी 40 बोलीभाषा आहेत, पण आता त्या लुप्त होत आहेत, मृत पावत चालल्या आहेत. भाषा ही नदीप्रमाणे प्रवाही राहिली पाहिजे, पण भाषा ही नदीप्रमाणे प्रवाही कशी राहील, तर जेव्हा नदीला मिळणारे झरे, ओघोळ हे तिला मिळत राहतील व तेव्हा ती समृद्ध आणि प्रवाही बनेल. हे झरे, ओघोळ म्हणजेच बोलीभाषा. या बोलीभाषा टिकून राहणे गरजेचे आहे. बोलीभाषेमध्येसुद्धा अनेक म्हणी आहेत, जसे…‘खिशात नाय दमडी आणि खायचो हा काsंबडी’, ‘खुला भांडता वझरा वांगडा’, ‘तरण्याक लागली कळ आणि म्हातऱयाक इला बळ’, ‘माले ना तुले घाल कुत्रा ले’, ‘चिडी खोपामा नि जीव धोकामा’. बोलीभाषेला बरेच जण ‘‘केवढी ही अशुद्ध भाषा!’’ असे बोलताना दिसतात, पण भाषा ही शुद्ध आणि अशुद्ध नसते. प्रत्येक बोलीभाषेचा तिचा स्वतःचा गोडवा असतो. दर दोन मैलांवर भाषा बदलते आणि समृद्ध पावते. त्यामुळे भाषा ही शुद्ध आणि अशुद्ध असे विभाजन न करता प्रमाणभाषा आणि बोलीभाषा असे विभाजन होते. जर आपण आपली बोलीभाषा बोललो नाही तर ती लुप्त होईल आणि नाहीशी होईल. तेव्हा ती बोलायला लाजू नका. आपल्या बोलीभाषेचे जतन करा.

आमच्या शाळेत मराठी विषयाच्या बाई राधिका मोरे (उपक्रमशील शिक्षिका ) यांनी बोलीभाषेला घेऊन एक उपक्रम राबविला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांची जी बोलीभाषा आहे, त्यामध्ये त्यांनी ‘‘एक गाणे गाऊन दाखवा, कथा सांगा’’ असे सांगितले. काही मुले सुरुवातीला लाजायची. आमची भाषा समजेल की नाही या संभ्रमात होती, पण काही धीट मुलांनी गाणी गाऊन दाखविली. बाईनी त्याचे video काढून facebook वर upload केले. खूप प्रतिसाद मिळाला. मुले आनंदी झाली. काही मुले बाईंकडे येऊन आमच्याकडे लग्नात हे गाणे गातात, आमच्या आजींनी आज ही कथा सांगितली, असे सांगू लागले. म्हणजे त्यांच्यात आवड निर्माण झाली आणि आवड निर्माण झाली की, ती गोष्ट हृदयापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही.

मराठी विषयाच्या वरिष्ठ शिक्षिका श्रद्धा माने यांनीसुद्धा मराठी भाषेचा शब्दसंग्रह, शब्दसंपत्तीवर उपक्रम केला. त्यांनी फळ्यावर एक मराठी शब्द लिहिला आणि मुलांना सांगितले की, तुम्ही या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून एक नवीन शब्द लिहायचा आणि त्या नवीन शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून पुन्हा एक नवीन शब्द लिहायचा अशा प्रकारे मराठी शब्दांची साखळी तयार करायची.

मुलांनी बाईंनी सांगितल्याप्रमाणे शब्दांची साखळी तयार केली. बाइं&नी वह्या तपासायला घेतल्या तेव्हा एका मुलाने ‘आढाळा’ शब्द लिहिला होता. बाईंनी तो शब्द वाचून दाखवल्यावर वर्गातील बाकी सगळे मुले हसायला लागली. तो शब्द लिहिणारा मुलगा मात्र हिरमुसला. कावराबावरा झाला. बाइंनी त्याला जवळ बोलावलं, त्याला शाबासकी दिली आणि सांगितलं की, ‘‘अरे, हा शब्द बरोबर आहे. मालवणमध्ये विळीला ‘आढाळा’ बोलतात. विळीला समानार्थी शब्द ‘आढाळा’ आहे.’’ तो मुलगा आनंदी झाला. माझी भाषा बाईंना समजते. तसे इतर मुलांनीसुद्धा त्यांच्या बोलीभाषेतील शब्द लिहायला सुरुवात केली.

कोणी ‘उलातणं’ बोलतो, तर कोणी ‘पलेता’ बोलतो, तर कोणी ‘उच्चटनी’, तर कोणी ‘काविलता’. प्रत्येकाची बोलीभाषा ही भिन्न भिन्न आहे.आपण आपल्या मुलांशी आपल्या मातृभाषेतून संवाद साधला पाहिजे. माझा मुलगा सर्वेश जर मी त्याला बोलले, “सर्वेश, रात्री लवकर झोप. लवकर निजलास तर सकाळी उशीर होणार नाही उठायला. पटकन उठशील.’’ हा मी माझ्या मुलाशी दोन वाक्यांचा संवाद साधला. त्यामध्ये मी त्याला किती शिकवलं. ‘रात्री’ला विरुद्धार्थी ‘सकाळ’ शब्द आहे. ‘झोप’ला समानार्थी शब्द ‘निज’ आहे. ‘झोप’ला विरुद्धार्थी शब्द ‘उठ’ आहे. हे किती शिकवलं मी त्याला, पण आपल्याला convent ची सवय लागली आहे ना! माझा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकतो. मग मला त्याच्याशी इंग्रजीत बोलले पाहिजे असा बहुधा पालकांचा रोख दिसतो. मग ते बोलताना दिसतात, ‘‘गो अॅण्ड स्लीप.’’ तीन शब्दांमध्ये संवाद संपला.

रस्त्यात कुत्रा मागे लागला तर आपण ‘‘हड…हड’’च बोलतो. तिथे आपण ‘‘Excuse me, Don’t follow me, go away’’ बोलत नाही. तेव्हा मुखातून बाहेर येते ती आपली मातृभाषा. आताच्या फास्ट फूडच्या जगात ‘जंक फूड’ ही आवड असेल, पण वरणभात ही आपली संस्कृती आहे, संस्कार आहे हे आपण मुलांना सांगितलं पाहिजे, त्याच्यामध्ये रुजवलं पाहिजे.

आज मराठी भाषा टिकवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागत आहेत. हा प्रश्न आजचा नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक मुंबईमध्ये दादरला मराठी ग्रंथसंग्रहालयात उद्घाटनप्रसंगी भाषण करताना ते बोलले होते की, “आईच्या पोटी जन्मलेले मूल दाईच्या दुधावर वाढत आहे. आज आपलीच भाषा आपल्याला परकी होत चालती आहे. उद्या तिच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल’’ आणि खरंच आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे.