मराठवाड्याला वादळवार्‍याने झोडपले! विजांच्या कडकडाटात पावसाचे धुमशान

दिवसभर रणरणत्या उन्हाने हैराण झालेल्या मराठवाड्याला सायंकाळी वादळीवार्‍यासह तुफान पावसाने झोडपून काढले. अचानक विजांच्या कडकडाटात तुफान पाऊस सुरू झाल्याने लोकांची दाणादाण उडाली. लातुरात वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला असून बीड, धाराशिवमध्ये फळबागा आडव्या झाल्या. अनेक ठिकाणी वादळामुळे झाडे उन्मळून पडली असून विजेचे खांब कोसळल्याने वीज बेपत्ता झाली. रात्री उशिरापर्यंत शेकडो गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य होते.

मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून तापमान चाळिशीपार गेले आहे. शनिवारी सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उष्मा होता. सायंकाळी अचानक आभाळात काळ्याकभिन्न ढगांची दाटी झाली आणि बघता बघता वादळी वार्‍यासह पावसाला सुरूवात झाली. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, लातूर, हिंगोली, जालना, धाराशिवला पावसाने झोडपून काढले. सोसाट्याच्या वार्‍याने आंब्याचे प्रचंड नुकसान झाले. हिंगोली शहरासह कळमनुरी. औंढा नागनाथ, सेनगाव, वसमत परिसरालाही पावसाने झोडपून काढले. अवकाळीमुळे काढणीला आलेल्या हळदीचे नुकसान झाले.

नांदेड जिल्ह्यात सिडको, तरोडा, मालेगाव, अर्धापूरचा परिसर, नांदेड शहर, तुप्पा, विष्णूपुरी, सोनखेड, लोहा परिसरात हलका पाऊस झाला. सोसाट्याच्या वार्‍यामुळे शहर आणि परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तरोडा, सिडको, विष्णूपुरी भागातील वीजपुरवठा सायंकाळी खंडित झाला. बीड जिल्ह्याला आठवड्यात तिसर्‍यांदा अवकाळीने झोडपले आहे. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि तुफान पावसाने दाणादाण उडाली. लातूर जिल्ह्यातही वादळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले. ग्रामीण भागात अनेकांच्या घरांवरील पत्रे, कडब्याच्या बनमीवर झाकलेले प्लास्टिक उडून गेले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. औसा, चाकूर, नणंद आदी ठिकाणी पावसाने पिकांचे नुकसान झाले. चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे सार्थक संतोष ढोले (21) हा शेतात काम करत असताना वीज पडून ठार झाला. धाराशिव, लोहारा, उमरगा आदी परिसरालाही वादळी पावसाने जबर तडाखा दिला.