बाप्पाच्या विसर्जनासाठी मोबाईल व्हॅनचा रथ

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्राधान्य आणि प्रोत्साहन देणारी मुंबई महानगरपालिका या वर्षी विसर्जनासाठी मोबाईल व्हॅनची व्यवस्था करणार आहे. ही मोबाईल व्हॅन आकर्षक फुलांनी सजवून रथाच्या स्वरूपात सोसायटय़ांच्या दारात येणार आहे. या ठिकाणी मूर्ती पालिकेच्या स्वाधीन केल्यानंतर पालिकेकडून या मूर्तीचे विसर्जन विधिवत पद्धतीने केले जाणार आहे.

मुंबईत सुमारे बारा हजारांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर दोन लाखांवर ठिकाणी घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. या वर्षी मंगळवार, 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे पालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये भाविकांनी कृत्रिम तलावात मृर्तींचे विसर्जन करून पालिकेच्या पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक वॉर्डात मोबाईल व्हॅन उपलब्ध केली जाणार आहे. संपर्क करणाऱया भाविकांची मूर्ती पालिका सोसायटय़ांमध्ये येऊन विसर्जनासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती उपआयुक्त आणि गणेशोत्सवाचे समन्वयक रमाकांत बिरादार यांनी दिली.

दोन दिवस मुदतवाढ

मंडळांना उत्सवाच्या परवानगीसाठी अर्ज करण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवण्यात येणार असून आता 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. पालिकेकडे आतापर्यंत 3400 हून जास्त अर्ज आले असून यातील तीन हजारांवर परवानग्या देण्यात आल्या आहेत. तर इतर परवानगीच्या प्रक्रियेत आहेत.

या वर्षी 300 कृत्रिम तलाव

  समुद्र अथवा नैसर्गिक स्रोतांमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा विघटन न होणाऱया विसर्जित केल्यास पर्यावरणाला हानी पोहचत असल्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षी पालिकेने पुढाकार घेतला असून 300 हून जास्त कृत्रिम तलाव तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.  वॉर्ड स्तरावर याचे नियोजन करण्यात येत आहे. मुंबईत विसर्जनासाठी 308 कृत्रिम तलाव, 69 नैसर्गिक विसर्जन स्थळांची व्यवस्था आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी निर्माल्य कलशाची व्यवस्था, वैद्यकीय चमू, विसर्जनाच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.