सिराजचेच राज्य, क्रमवारीत हेजलवूडचे साम्राज्य केले खालसा

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील तुफानी कामगिरीच्या जोरावर आयसीसीच्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. जेतेपदाच्या लढतीत श्रीलंकन फलंदाजांची दाणादाण उडविणाऱया सिराजने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडचे ‘नंबर वन’चे साम्राज्य खालसा केले.

मोहमद सिराजने एका षटकात 4 विकेट घेत श्रीलंकन फलंदाजीला भगदाड पाडले होते. या कामगिरीच्या जोरावरच त्याने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पुन्हा एकदा ‘नंबर वन’चे सिंहासन काबीज केले. आशिया चषक स्पर्धेतील ‘मालिकावीर’ ठरलेला फिरकीपटू कुलदीप यादवनेही टॉप-10 गोलंदाजांमध्ये स्थान मिळविले असले तरी क्रमवारीत त्याचे नुकसान झाले आहे.

आशिया चषक स्पर्धेपूर्वी मोहम्मद सिराज 643 गुणांसह नवव्या क्रमांकावर होता. मात्र आता त्याचे रेटिंग 694 वर पोहोचले असून त्याने जोश हेजलवूडची अव्वल स्थानावरून हकालपट्टी केली. म्हणजेच मोहमद सिराजने आठ स्थानांची ‘हनुमान उडी’ घेत अव्वल स्थान मिळविले. हेजलवूड आता दुसऱया स्थानावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग आता 678 आहे. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टलाही एक स्थान गमवावे लागले आहे. त्याची 677 रेटिंगसह तिसऱया क्रमांकावर घसरण झाली. मुजीब उर रहमान याआधीही चौथ्या क्रमांकावर होता आणि अजूनही चौथ्या क्रमांकावर आहे. राशीद खान 655 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. मिचेल स्टार्कला याचा सर्वाधिक तीन स्थानांचा फटका बसला आहे. तो थेट सहाव्या क्रमांकावर घसरलाय. न्यूझीलंडचा मॅट हेन्री 645 रेटिंगसह सातव्या क्रमांकावर आला आहे. त्याचवेळी ऍडम झॅम्पा आठव्या क्रमांकावर आला आहे.

…तरीही कुलदीपला फटका

दुसरीकडे कुलदीप यादवने आशिया चषकात चांगली गोलंदाजी करून ‘मालिकावीरा’चा बहुमान पटकाविला, मात्र तरीही त्याला तीन स्थानांचा फटका बसलाय. आधीच्या रँकिंगमध्ये तो 656 रेटिंगसह सातव्या क्रमांकावर होता, मात्र आता रेटिंग 638 वर आली असून तो नवव्या क्रमांकावर गेलाय. शाहीन शाह आफ्रिदी 632 रेटिंग गुणासह दहाव्या क्रमांकावर आहे.