मुंबई विमानतळावरून वर्षभरात पाच कोटी प्रवाशांचा विमान प्रवास

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वर्षभरात तब्बल 5 कोटी 15 लाख प्रवाशांनी विमानाने प्रवास केला असल्याचे समोर आले आहे. 2022मधील विमान प्रवाशांच्या तुलनेत तब्बल 35 टक्क्यांनी प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाढ ठरली आहे. देशातील विमान वाहतूक उद्योगासाठी 2023 हे वर्ष लाभदायी ठरले आहे. कोरोनापूर्व आणि कोरोनानंतर प्रवाशी वाहतूक पाहता गतवर्षी प्रवासी संख्या वाढली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास केलेल्या 5 कोटी 15 लाख प्रवाशांपैकी 2.5 कोटी प्रवाशी देशविदेशातून मुंबईत आले होते, तर 2.6 कोटी प्रवासी मुंबईतून इतर राज्यांसह देशभरात गेले आहेत. देशांतर्गत प्रवासात दिल्ली, बेंगळुरू आणि चेन्नई ही ठिकाणे तर आंतरराष्ट्रीय प्रवासात दुबई, लंडन आणि अबुधाबी सर्वाधिक पसंतीची ठिकाणे ठरली आहेत. दरम्यान नोव्हेंबर व डिसेंबर या कालावधीत सर्वाधिक विमान प्रवास करण्यात आला. यामध्ये 25 नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात 1 लाख 67 हजार 134 प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. यात 1 लाख 20 हजारांहून अधिक देशांतर्गत प्रवासी आणि 46 हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश आहे.