मुंबई विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी, 48 तासांत 10 लाख डॉलर देण्याची मागणी

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी सहार पोलीस स्थानकामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 385 आणि 505 (1) (बी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, [email protected] या आयडीवरून धमकीचा मेल आला आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) च्या फिडबॅक इनबॉक्समध्ये हा मेल आला होता.

धमकी देणाऱ्याने 10 लाख डॉलर बिटकॉईनच्या स्वरुपात देण्याची मागणी केली आहे. ही मागणी पुढील 48 तासांमध्ये पूर्ण न केल्यास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल 2 बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे. एवढेच नाही तर हा स्फोट टाळायचा असेल तर तात्काळ पैसे पाठवा अन्यथा पुढील 24 तासात दुसरा मेल येईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या मेलमुळे प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच हा मेल पाठवण्यासाठी ज्या आयपी एड्रेसचा वापर करण्यात आला त्याचा ठावठिकाणाही लागला असून आरोपीची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

दरम्यान, मुंबईतील कामाठीपुरा भागात बॉम्बस्फोट होईल असा खोटा दावा करत मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन लावणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर 13 ऑगस्ट रोजीही अशाच एका प्रकरणात 43 वर्षीय व्यक्तीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. मुंबई 100 किलोंचा बॉम्बस्फोट होणार असल्याचा खोटा फोनकॉल सदर आरोपीने केला होता.