मुंबईचा विदर्भ झाला; अकोला सर्वात हॉट पारा 2 ते 3 अंश सेल्सियसने वाढणार

गोवा, सिंधुदुर्ग वगळता राज्यभरातून मान्सूनने आठवडाभर आधीच एक्झीट घेतली असून ऑक्टोबर हीटने एण्ट्री केली आहे. मुंबईची अक्षरशः भट्टी झाली असून बोरिवलीपासून वरळी, मुलुंड, ठाण्यापर्यंत विदर्भासारखे चटके बसणारे ऊन जाणवत आहे. विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक 37 अंश सेल्सियस तर सांताक्रुझमध्ये सर्वाधिक 36 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. पुढच्या दोन दिवसांत पारा आणखी 2 ते 3 अंश डिग्री सेल्सियसने वाढेल. असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत अगदी महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा. लहानग्यांना शक्यतो बाहेर नेऊ नका. शाळेत जाताना टोपी घाला. पुरेसे पाणी त्यांच्यासोबत द्या, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

मुंबईतील तापमान

बोरिवली 34, चेंबूर 34, कुलाबा 33, मुलुंड 34, पवइ 34, सांताक्रुझ 36, वरळी 35, नवी मुंबई 35, पालघर 34, ठाणे 35 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.

राज्यभरातील तापमान

अकोला 37, अमरावती 36, छत्रपती संभाजीनगर 34, बीड 34, बुलढाणा 33, चंद्रपूर 35, गडचिरोली 35,
गोंदिया 35, जळगाव 36, जालना 33, कोल्हापूर 33, मालेगाव 33, नागपूर 35, नांदेड 36, नंदुरबार 35, नाशिक 34, धाराशीव 33, परभणी 36, पुणे 35, रत्नागिरी 34, सांगली 34, सातारा 34, सोलापूर 36, वर्धा 36, यवतमाळ 35 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.

का वाढले तापमान…

येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्यभरातून एक्झिट घेईल असा अंदाज होता. परंतु आठवडाभर आधीच म्हणजेच गेल्या दोन दिवसांतच मान्सून गायब झाला. त्यामुळे अनेक भागांत तापमान वाढले असून येत्या दोन दिवसांत आणखी 2 ते 3 अंश सेल्सियसपर्यंत तापमानात वाढ होईल, असा अंदाज पुण्याच्या हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे.

लहानग्यांना सर्वाधिक फटका

– गेल्या आठवडाभरापासून मुंबईत कडक ऊन आहे. दोन दिवसांपासून असह्य उकाडा आणि उन्हाचे चटके बसत असून त्याचा सर्वाधिक फटका लहानग्यांना बसत असल्याची माहिती नायर रुग्णालयाच्या कान, नाक व घसा शस्त्रक्रिया विभागाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. बची हाथीराम यांनी दिली.
– मुलांच्या नाकातून रक्ताचे थेंब पडत असल्याच्या तक्रारी अनेक पालकांनी केल्या. गेल्या काही दिवसांत रोज पाच ते सहा मुले रुग्णालयात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व चाचण्या केल्यानंतर मुलांना कडक उन्हाचा त्रास होत असल्याचे दिसून आले. उष्णता आणि प्रदूषण यांचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे डॉ. बची यांनी सांगितले.