Mumbai crime news – विमानतळावरून 1 कोटी 64 लाखांचे सोने जप्त  

सोने तस्करी प्रवाशाला सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) ने अटक केली. कमाल उद्दीन असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 1 कोटी 64 लाखांचे सोने जप्त केले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

नववर्षाच्या अनुषंगाने ड्रग्ज, चलन, परदेशी चलनच्या तस्करीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी ‘एआययू’ने घेतली होती. परदेशातून एकजण सोने घेऊन येणार असल्याची माहिती ‘एआययू’ला मिळाली. त्या माहितीनंतर ‘एआययू’ने विमानतळावर सापळा रचला. शनिवारी कमाल हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्याकडील साहित्याची तपासणी केली तेव्हा त्याच्याकडे 2935 ग्रॅम सोने मिळून आले.

जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 1 कोटी 64 लाख रुपये इतकी आहे. सोने तस्करीप्रकरणी त्याचा ‘एआययू’ने जबाब नोंदवून घेतला. त्या सोन्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली. विमान प्रवासात त्याला अज्ञात व्यक्तीने ते सोने दिल्याचे कमालने ‘एआययू’च्या अधिकाऱ्याना सांगितले.