मुंबईतील बाप्पांची माहिती एका क्लिकवर

मुंबईकर आणि देशभरातून आलेल्या पर्यटकांना मुंबईतील गणपती पाहता यावेत, कोणती मंडळे कुठे आहेत, तिथे कसे जावे, यासाठी बाप्पा आणि गणेशमंडळांची माहिती या वर्षीपासून महापालिकेच्या व्हॉट्सअँप चॅटबॉट आणि संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर गर्दी टाळण्यासाठी गणेशभक्तांना जवळचे विसर्जनस्थळ कुठे उपलब्ध आहे आणि विसर्जनाची वेळही नोंदवता येणार आहे.

मुंबईत गणेशोत्सवाची मोठी धूम असते. मुंबईसह देशभरातील पर्यटक गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येतात. दर्शनाबरोबरच सजावट, आरास, देखावे पाहण्यासाठी येत असतात. मुंबईत प्रत्येक गणेशोत्सव मंडळांने वेगवेगळे उपक्रम राबवून आपले वेगळेपण कायम ठेवले आहे. त्यामुळे मुंबईतली ही गणेश मंडळे कुठे आहेत, तिथे कसे जावे, याची मार्गदर्शन मुंबई महापालिका चॅटबॉक्स आणि संकेतस्थळाद्वारे सुरू केले आहे. त्याचबरोबर घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याआधी घराजवळील विसर्जन स्थळ आणि कोणत्या वेळेत विसर्जन करता येईल, याची सुविधाही महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती उपआयुक्त आणि गणेशोत्सवाचे समन्वयक रमाकांत बिरादार आणि माहिती तंत्रज्ञान संचालक शरद उघडे यांनी दिली.

संकेतस्थळ असे पाहा
https://portal.mcgm.gov.in यावरदेखील श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या ऑनलाईन सेवा गणेशभक्त, नागरिक व पर्यटकांनासाठी उपलब्ध आहेत. महापालिका संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर नकाशे, अंतरंग व अहवाल या टॅबवर क्लिक केल्यानंतर गणेशोत्सव स्टोरी मॅप 2023 यात जवळील गणेश मंडळ, विसर्जन स्थळे तसेच इतरही माहिती उपलब्ध होणार आहे. या स्टोरी मॅपच्या मदतीने संबंधित गणेश मंडळाच्या स्थानापर्यंत पोहोचणे, मूर्ती विसर्जन स्थळापर्यंत जाण्याचे दिशानिर्देश, तेथपर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची साधने, रहदारीसाठी लागणारा वेळ इत्यादी माहितीदेखील मिळणार आहे. विसर्जन स्थळ नैसर्गिक आहे की कृत्रिम याचीही माहिती मिळणार आहे.

व्हॉटस्ऍप् चॅटबॉट असे वापरा
महापालिकेची मायबीएमसी व्हॉटस्ऍप् चॅटबॉट (MyBMC WhatsApp Chatbot) ही भ्रमणध्वनी आधारित सेवा 8999228999 या क्रमांकावर उपलब्ध आहे. यावर आपल्या नजीकचे गणेश मंडळ व मूर्ती विसर्जन स्थळ शोधण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासाठी या चॅटबॉट क्रमांकावर जाऊन पर्यटक हा पर्याय निवडावा. त्यानंतर मुख्य सूची (लिस्ट) या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर, माझ्या जवळच्या सुविधा यामध्ये क्लिक केल्यास गणपती मंडळ तसेच गणपती विसर्जन असे दोन पर्याय दिसतात.

विसर्जन ठिकाण, वेळ अशी नोंदवा!
श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकाच वेळी गर्दी होऊ नये, यासाठीदेखील महापालिकेने https://portal.mcgm.gov.in या आपल्या संकेतस्थळावर मूर्ती विसर्जन वेळ नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुविधा विकसित केली आहे. गणेशोत्सव मंडळ अथवा भाविकांनी संकेतस्थळावर ’नागरिकांकरीता’ या सदरामध्ये जाऊन ’श्री गणेश मूर्ती विसर्जनाचे स्लॉट बुकींग’ हा पर्याय निवडावा. (महानगरपालिका पोर्टल dन नागरिकांकरीत्ना गणपती विसर्जनाची स्लॉट बुकींग) अथवा https://mumgis.mcgm.gov.in/Bappa_Visarjan/ या लिंकचा उपयोग करावा.