सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला

अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या क्रेडिट रेटिंगमध्ये झालेली घट, वाढते कर्ज याचे पडसाद जगभरातील शेअर बाजारात उमटले. मुंबई शेअर बाजारात सलग तिसऱया दिवशी सेन्सेक्स गडगडला. गुंतवणूकदारांचे आज सुमारे एक लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अर्थात निफ्टीच्या सेन्सेक्समध्येही घसरण झाली आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 819 अंकांनी घसरला. बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्सची घसरण सुरूच होती. अखेर 542 अंकांची घसरण होऊन सेन्सेक्स 65240.68 अंकांवर स्थिरावला. बुधवारी शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारमूल्य 303.33 लाख कोटी होते. आज 302.32 लाख कोटींपर्यंत घसरले. यामुळे गुंतवणूकदारांचे 1.01 लाख कोटी रुपये बुडाले. सलग तीन दिवस बाजारात सेन्सेक्सची तब्बल 1287 अंकांनी पडझड झाली आहे. निफ्टीचा अंक 144.90 ने खाली आला. बाजार बंद होताना निफ्टी 19296 अंकांवर स्थिरावला होता.