बाप्पा पावला! मुंबईसाठी वर्षभराचे पाणी जमा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात  धरणांत आज  14 लाख 8 हजार 383 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हे पाणी 97.31 टक्के असून मुंबईला दररोज होणारा 3850 दशलक्ष लिटर पाणीसाठा पाहता हे पाणी पुढील वर्षभर पुरणारे आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने टेन्शन वाढले असताना आता मात्र वर्षभराचे पाणी जमा झाल्याने गणेशोत्सव सुरू होत असताना मुंबईसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

मुंबईला मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सात धरणांत 1 ऑक्टोबर रोजी 14 लाख 47 हजार 343 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे असते. यानुसार पाणी पुरवठय़ाचे नियोजन केले जाते. यंदा जून महिना कोरडा गेल्याने 1 जुलैपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. परंतु ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने धरण क्षेत्रात हजेरी लावल्याने 8 ऑगस्ट रोजी 10 टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली. परंतु धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत समाधानकारक वाढ होत नसल्याने सप्टेंबर 15 नंतर आढावा घेत पुन्हा एकदा पाणीकपातीचा निर्णय विचाराधीन असल्याचे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे मुंबईचे टेन्शन पुन्हा वाढले होते. मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सातही धरणात जोरदार पाऊस झाल्याने 97.31 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हा पाणीसाठा 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुंबईची तहान भागेल इतका उपलब्ध झाल्याने मुंबईवरील पाणीकपात टळली आहे.

मुंबई, ठाण्यात 24 सप्टेंबरपर्यंत तुरळक पावसाचा अंदाज

मुंबईसह उपनगरात आज नुसतेच ढगाळ वातावरण होते. ठाण्यात मध्येच सूर्यनारायण दर्शन देत होता. तर अधूनमधून एखादी मोठी सर येऊन जात होती, मुंबईत कुलाबा येथे 7.0 मिमी तर सांताक्रुझ येथे 11.8 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. पुढचे चार दिवस म्हणजेच 24 सप्टेंबरपर्यंत मुंबई, ठाण्यासाठी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आर्द्रतेचे प्रमाणही अधिक असल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. मुंबईत कमाल 33 तर किमान 26 डीग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. पुढच्या 48 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल. वातावरण ढगाळ असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईत विविध ठिकाणी झाडांच्या फांद्या तसेच झाडे उन्मळून पडण्याच्या 7 घटना घडल्या तर एका ठिकाणी घराचा भाग कोसळण्याची घटना घडली. एकूण 4 ठिकाणी शॉर्टसर्कीटची घटना घडली. मात्र, कुठेही जीवितहानी झाल्याचे किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.