झाडांच्या धोकादायक फांद्या तोडा; आणखी एक हजार सोसायटय़ा, आस्थापनांना पालिकेची नोटीस

पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर आल्यामुळे पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रामधील झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्याचे काम वेगाने सुरू केले आहे, तर शासकीय, निमशासकीय आस्थापना आणि खासगी सोसायटय़ांनाही त्यांची नियमानुसार जबाबदारी असल्याने नोटीस बजावून आपल्या क्षेत्रातील झाडांच्या धोकादायक फांद्या पावसाळ्याआधी तोडण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी सुमारे अडीच हजार नोटीस बजावण्यात आल्या होत्या, तर आता आणखी एक हजारांवर नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

  पावसाळ्यात धोकादायक झाडांच्या फांद्या कोसळून जीवित-वित्तहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून मोठय़ा झाडांच्या, विशेषतः जोरदार वारे वाहत असताना धोकादायक ठरू शकणाऱया झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्राrय पद्धतीने छाटणीची कामे उद्यान विभागाकडून सुरू आहेत. यंदा मुंबई महानगरात एकूण एक लाख 11 हजार 670 झाडांची छाटणी करण्याचे उद्दिष्ट आहे. यंदाही धोकादायक झाडांच्या फांद्या कोसळण्याची टांगती तलवार कायम असून मुंबईतील 3,690 खासगी सोसायटी, सरकारी व निमसरकारी संस्थांना पालिकेच्या उद्यान विभागाने नोटीस बजावली आहे. पावसाचे आगमन होण्याआधी झाडांच्या फांद्यांची छाटणी करून घ्या, असे आवाहन पालिकेच्या उद्यान विभागाने केले आहे. दरम्यान, रस्त्यांच्या दुतर्फा पार्ंकग वाहने फांद्या छाटणीत अडचण ठरत असल्याने वाहनधारकांनी वृक्ष छाटणीत पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन केल्याचे मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. गरज भासल्यास पालिकेच्या ‘1916’ या टोल फ्री क्रमांकावरदेखील संपर्क करा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

अशा बजावल्या नोटीस 

डी वॉर्ड, ग्रँट रोड  790

के पश्चिम, अंधेरी  669

एन वॉर्ड, घाटकोपर ..  306

पी साऊथ, गोरेगाव ..  275

पी उत्तर, मालाड  235

एम पश्चिम, चेंबूर  181

टी वॉर्ड, मुलुंड  135

एस वॉर्ड, भांडुप  115

मुंबईतील झाडांची स्थिती

वर्ष 2017मध्ये झालेल्या वृक्ष गणनेनुसार मुंबईत 29 लाख 75 हजार 283 झाडे आहेत. यापैकी 15 लाख 63 हजार 701 एवढी झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत, तर 11 लाख 25 हजार 182 एवढी झाडे शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत.

एकूण वृक्षांपैकी 1 लाख 85 हजार 964 झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. यापैकी रस्त्यांच्या कडेला असलेल्या 1 लाख 12 हजार 728 झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे आहे, तर 15 हजार 821 झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे काम सुरू असून 31 मेपर्यंत काम पूर्ण होईल.