देवधर करंडकावरही दक्षिणेचा कब्जा, अपराजित दक्षिण विभागाचा विजयाचा षटकार

दुलीप करंडकापाठोपाठ दक्षिण विभागाने प्रतिष्ठेच्या देवधर करंडकावरही आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात पूर्व विभागावर 45 धावांनी मात करत दक्षिण विभागाने स्पर्धेत नॉनस्टॉप विजयाचा अनोखा षटकार ठोकला. या स्पर्धेत त्यांना एकही संघ हरवू शकला नाही. तसेच या स्पर्धेत त्यांनी पूर्व विभागाला दोनदा हरविण्याची किमयाही साधली.

दक्षिण विभागाने उभारलेल्या 329 धावांचा पाठलाग करताना वासुकी कौशिकने सनसनाटी सुरुवात करत 2 बाद 10 अशी अवस्था केली. त्यानंतर कावेरप्पाने उत्कर्ष सिंगला बाद करून 3 बाद 14 अशी दुर्दशा केली होती, मात्र त्यानंतर सुदीप घरामी (41) आणि कर्णधार सौरभ तिवारीने (28) संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण गेल्या आठवडाभरात दोन शतकी खेळी करणाऱया रियान परागने 95 धावांची झंझावाती खेळी करताना कुमार कुशाग्रबरोबर (68) सहाव्या विकेटसाठी 105 धावांची झुंजार भागी रचली आणि सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर पूर्व विभागाने मान टाकली. याचा लाभ उठवत दक्षिण विभागाने सामन्यावरील आपली पकड अधिक मजबूत केली. दक्षिणेच्या गोलंदाजांनी पूर्व विभागाचा  डाव 283 धावांवर संपुष्टात आणत आपल्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मालिकेत दोन शतकांसह 354 धावा आणि 11 विकेट टिपणारा रियान ‘मालिकावीर’ ठरला, तर रोहन कुन्नुम्मल दक्षिणेच्या जेतेपदाचा शिल्पकार ठरला.

181 धावांची दणदणीत सलामी

दक्षिण विभागाच्या डावाला सलामीवीर रोहन कुन्नुम्मल आणि कर्णधार मयांक अगरवाल यांनी केलेल्या 181 धावांच्या दणदणीत सलामीमुळे 8 बाद 328 असा धावांचा डोंगर रचला. अगरवालने नाणेफेक जिंकली आणि दुसऱया क्षणाला फलंदाजीला उतरण्याचा निर्णय घेतला. आपण घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करताना रोहनसह त्याने जबरदस्त भागी रचली. रोहनने पूर्व विभागाच्या गोलंदाजीला फोडून काढले. त्याने रियान परागला सलग चौकार-षटकार ठोकत 68 व्या चेंडूंवर आपले शतक साजरे केले. त्याने आपल्या 75 चेंडूंच्या खेळीत 11 चौकार आणि 4 षटकार लगावले. रोहन सर्वप्रथम बाद झाला. त्यानंतर अगरवालने आपली विकेट गमावली, पण त्याला 63 धावांसाठी 83 चेंडूंचा सामना करावा लागला.

25 षटकांत 181 धावा करणाऱया दक्षिण विभागाला पुढील 25 षटकांत 147 धावाच काढता आल्या. दणदणीत सलामीनंतर नारायण जगदीशनने 54 धावांची खेळी केली. पूर्व विभागाच्या गोलंदाजांनी सलामीवीरांना बाद केल्यानंतर दक्षिण विभागाच्या फलंदाजांवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. रियान पराग, शाहबाझ अहमद आणि उत्कर्ष सिंगने प्रत्येकी 2-2 विकेट मिळविले.