जनतेने न्यायालयात जाण्यास घाबरु नये; सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी केले महत्त्वाचे विधान

न्यायालयाला जनतेने शेवटचा उपाय समजू नये, तसेच न्यायालयात जाण्यासाठी कोणीही घाबरण्याची गरज नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयात ‘संविधान दिन’ समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी चंद्रचूड यांनी हे मत व्यक्त केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कार्यक्रमात उद्घाटनपर भाषण केले. या समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवालआणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ‘लोक न्यायालय’ म्हणून आपली भूमिका बजावली आहे. नागरिकांनी न्यायालयात जाण्यास घाबरु नये तसेच न्यायालयाला शेवटचा उपाय म्हणून पाहू नये. जशी घटना आपल्याला प्रस्थापित लोकशाही संस्था आणि कार्यपद्धतींद्वारे राजकीय मतभेद सोडवण्याची परवानगी देते, त्याचप्रमाणे न्यायालय प्रणाली प्रस्थापित तत्त्वे आणि प्रक्रियांद्वारे अनेक मतभेद सोडविण्यास मदत करते. देशातील प्रत्येक न्यायालयातील प्रत्येक खटला हा घटनात्मक शासनाचा विस्तार आहे. गेल्या सात दशकांमध्ये देशाचे सर्वोच्च न्यायालय हे लोक न्यायालय म्हणून कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळेल या विश्वासाने हजारो नागरिकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

नागरिक त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण, बेकायदेशीर अटकेविरुद्ध आवाज उठवणे, बंधनकारक मजुरांच्या हक्कांचे संरक्षण, आदिवासींना त्यांच्या जमिनीचे रक्षण करण्याची केलेली मागणी, हाताने मैला साफ करणे यासारख्या सामाजिक दुष्कृत्यांना प्रतिबंध करणे आणि स्वच्छ हवा मिळण्याची मागणी करत आहेत. ही प्रकरणे न्यायालयासाठी केवळ कोट किंवा आकडेवारी नाहीत. ही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाकडून लोकांच्या अपेक्षा तसेच नागरिकांना न्याय देण्याच्या न्यायालयाच्या स्वतःच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहेत, असे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले.

सर्वोच्च न्यायालय हे कदाचित जगातील एकमेव न्यायालय आहे जिथे कोणताही नागरिक सरन्यायाधीशांना पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक यंत्रणेला चालना देऊ शकतो. सर्वोच्च न्यायालय आपल्या न्यायनिवाड्यांद्वारे नागरिकांना न्याय मिळण्याची हमी देण्याबरोबरच त्याची प्रशासकीय प्रक्रिया नागरिक केंद्रित असावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. जेणेकरून लोकांना न्यायालयाच्या कामकाजाशी जोडले जावे, असा विश्वास देखील चंद्रचूड यांनी व्यक्त केला आहे. लोकांनी न्यायालयाकडे जाण्यास घाबरू नये किंवा याकडे शेवटचा उपाय म्हणून पाहू नये. मला आशा आहे की आमच्या प्रयत्नांमुळे प्रत्येक वर्ग, जात आणि धर्माचे नागरिक आमच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवू शकतील आणि याकडे न्याय्य म्हणून पाहिले जाऊ शकेल, असे डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितले.