भाजप सरकार जनतेला कर्जात का ढकलत आहे; प्रियांका गांधी यांचा हल्लाबोल

केंद्र सरकार या आर्थिक वर्षात सुमारे 14 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेणार आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाकडून मिळत आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी भाजपला सवाल विचारले आहेत. भाजप सरकार सर्वसामान्य जनतेला कर्जात का ढकलत आहे, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

केंद्र सरकार या आर्थिक वर्षात 14 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेणार आहे. पण का?, याची काय गरज आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. स्वातंत्र्यापासून 2014 पर्यंतच्या 67 वर्षांत देशावर एकूण 55 लाख रुपये कर्ज होते. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते 205 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवले आहे. गेल्या 10 वर्षांत सुमारे 150 लाख कोटी रुपयांचे कर्ज भाजप सरकारने घेतले आहे. याचा हिशोब केला तर देशातील प्रत्येक नागरिकावर सुमारे दीड लाख रुपयांचे सरासरी कर्ज आहे. कर्ज घेतलेला हा पैसा राष्ट्रनिर्माणाच्या कोणत्या कामासाठी वापरला जात आहे?, असा सवालही त्यांनी पोस्टमध्ये केला आहे.

भाजपने 2014 मध्ये रोजागार निर्माण करण्याचे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या 10 वर्षात नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या की गायब झाल्या? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? शाळा आणि रुग्णालयांचं काय झालं? सार्वजनिक क्षेत्र मजबूत झाले की कमकुवत झाले? मोठे- मोठे कारखाने आणि उद्योग उभारले गेले का, असे सवालही प्रियांका गांधी यांनी केले आहे.

कर्ज घेतलेले पैसे गेले कुठे? कोणत्या गोष्टीवर किती पैसा खर्च झाला? मोठ्या अब्जाधीशांच्या कर्जमाफीवर किती पैसे खर्च झाले? आता पुन्हा केंद्र सरकार नवे कर्ज घेण्याची तयारी करत आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक संकट अशा समस्या असताना भाजप सरकार जनतेला कर्जात का ढकलत आहे, असा सवालही प्रियांका गांधी यांनी केला आहे.