मुस्लिमांना मतदान करता येऊ नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे; ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या

लोकसभेसाठी देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खळबळजनक आरोप केला असून त्या भाजपवर संतापल्या आहेत. पश्चिम बंगालमधील मुस्लिमांना मतदान करता येऊ नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय यंत्रणा आणि सुरक्षा दल भाजपच्या निर्देशानुसार काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुर्शिदाबाद येथील सभेत त्यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला.

केंद्रीय यंत्रणांना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, तुमची नोकरी दीर्घकाळ आहे. तुम्हाला अजून बराच काळ काम करायचे आहे. आपण केंद्रीय यंत्रणांचा सन्मान करतो. त्यामुळे भाजपच्या निर्देशांनुसार काम करू नका, त्यांच्या निर्देशानुसार तृणमूलचे कार्यकर्ते आणि नागरिकांवर बलप्रयोग करू नका, असे कोणतेही काम करू नका, ज्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

भाजपकडून दिशाभूल करणारा प्रचार करण्यात येत आहे. सर्वत्र भाजपच्या प्रचारमंत्र्यांचे चेहरे दिसत आहे. त्यामुळे जनतेत दहशत आहे. ते कधी काय करतील याचा नेम नाही. कधी कुठे हिंसाचार घडवतील, कधी कोणावर हल्ला करतील, त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे. जनता या सर्व दहशतीला कंटाळली आहे. पश्चिम बंगालमधील मुस्लिमांना मतदानच करता येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.