‘जय श्री राम, भारत माता की जय’…अशा घोषणांनी देशातील समस्या संपणार का; वरुण गांधी यांचा भाजपला घरचा आहेर

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष राजकीय समीकरणे तयार करण्यात गुतंले आहेत. त्यातच भाजपमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर येत आहेत. भाजपचे खासदारच पक्षाला घरचा आहेर देत पक्षांची धोरणे आणि कामकाज यावर टीका करत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी हे पक्षावर टीका करण्यात आघाडीवर असतात. त्यातच आता वरुण गांधी यांनीही उघडपणे पक्षावर टीका करत भाजपला घरचा आहोर दिला आहे. ते उत्तर प्रदेशच्या पीलभीत मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. आगामी निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा असतानाच वरुण गांधी यांनी थेट पक्षाच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह उभे केले. पक्षाकडून होणारी घोषणाबाजी, सरकारी योजनांची स्थिती, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरून त्यांनी पक्षालाच घेरले आहे.

वरुण गांधी यांच्या या भूमिकेवरून ते भाजपशी फारकत घेऊ शकतात, अशी अटकळ राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. जे कर्जाची परतफेड करू शकत नाही, त्यांची संपत्ती जप्त करून त्याचा लिलाव होते. यावर उपाय काय, फक्त नारेबाजीने असे प्रश्न संपणार आहेत काय, जय श्री राम आणि भारत माता की जय म्हणून देशातील प्रश्नांवर उत्तरे सापडणार आहेत काय, असा सवालही त्यांनी केला.

आपणही देशभक्त आहोत, हनुमानाचे आणि श्री रामाचे भक्त आहोत, मात्र, देशभक्तीचे आणि देवतांचे नारे दिल्याने समस्या सुटणार आहेत का, देशाची परिस्थिती सुधारण्यासाठी धोरणात काही बदल होणार आहेत का, असा सवालही त्यांनी केला. उज्ज्वला योजनेतंर्गत साडेसात कोटी लोकांना गॅस सिलंडर देण्यात आले. मात्र, वाढत्या दरामुळे पुन्हा सिलिंडर घेणे अनेकांना जमले नाही आणि ते पुन्हा चुलीकडे वळले. सिलिंडरचे दर 1100 रुपये आहेत. सर्वसामान्यांना हे दर परवडणारे आहेत का,असा सवालही त्यांनी केला.

देशात बेरोजगारी वाढत असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असेही वरुण गांधी म्हणाले. अनेक सरकारी पदे रिक्त आहेत. त्यात भरती का करत नाही, या रिक्तपदांबाबतची आकडेवारी एक कोटीवर गेली आहे. रिक्त पदे भरती न करता सरकार पैसे वाचवत आहे, पण सर्वसामान्यांना आधार कसा देणार, प्रत्येकाला रोजगाराची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. हे वाचवलेले पैसे सरकार निवडणुकांच्या वेळी मोफत रेशन धान्य देण्यासाठी वापरतील.’तेरी मोहब्बत में हो गए फना, मांगी थी नौकरी मिला आटा-दाल-चना’ असा शेर ऐकवत त्यांनी सरकारला टोला लगावला. हा कायमस्वरुपी तोडगा नाही. ही फक्त मलमपट्टी आहे. देश चालवणे सोपे काम नाही, हे खूप संवेदनशीलतेचे काम आहे, असेही ते म्हणाले.

सरकारी रुग्णालये, वाढती महागाई, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न या मुद्द्यांवरूनही वरुण यांनी सरकारला घेरले. मोठ्या उद्योगपतींना कोट्यवधींची कर्ज सहज मंजूर होतात. मात्र, शेतकरी आणि सर्वसामान्यांना एखादे काम सुरू करण्यासाठी कर्ज मिळत नाही, असेही ते म्हणाले. वरुण गांधी यांच्या या भूमिकेमुळे आता ते भाजपपासून फारकत घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.