गोवा विमानतळावर नौदलाच्या मिग- 29 लढाऊ विमानाचा टायर फुटला

हिंदुस्थान नौदलाच्या मिग- 29 लढाऊ विमानाचा टायर फुटल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गोव्यातील दाबोलिम विमानतळावर घडली आहे. टायर फुटल्यामुळे विमान मिग-29 टॅक्सीवेवर अडकले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेमुळे धावपट्टी दुपारी 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. याचा परिणाम इतर विमानसेवेवरही झाला होता.

या घटनेची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान टेकऑफसाठी धावपट्टीच्या दिशेने जात असताना अचानक त्याचा टायर फुटला. टायर फुटल्याने विमान टॅक्सीवेवर अडकले. टॅक्सीवेवर विमान अडकल्यामुळे दुपारी चार वाजेपर्यंत विमानांची वाहतूक ठप्प करण्यात आली. धावपट्टी बंद असल्यामुळे प्रवाशांच्या विमानसेवेवरही परिणाम झाला.

दाबोलिम विमानतळ दक्षिण गोवा भागात आहे, जो भारतीय नौदल तळ INS हंसाचा भाग आहे. दाबोलिन विमानतळाचे संचालक एसव्हीटी धनंजय यांनी सांगितले की, या घटनेमुळे 10 विमानांची सेवा प्रभावित झाली आहे. काही उड्डाणे मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आली.