हायकोर्टात पाळणाघर!

 

उच्च न्यायालयाच्या तळमजल्यावर पुन्हा लहान मुलांचा किलबिलाट ऐकू येणार आहे. कोरोना काळात बंद झालेल्या पाळणाघराचे नूतनीकरण केले असून मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या हस्ते या पाळणाघराचे उद्घाटन करण्यात आले. न्यायालयीन कर्मचारी व वकिलांच्या लहान मुलांसाठी हे पाळणाघर खुले असेल. न्यायालयातील महिला कर्मचारी व वकिलांना न्यायालयीन कामकाज सांभाळताना मुलांसाठी वेळ देता येत नाही. मुले व कर्तव्य यांचा समतोल साधताना तारेवरची कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या समितीने पाळणाघराचे नूतनीकरण करण्यावर भर दिला.

 

अनेक सुविधांचा समावेश

पाळणाघर सुशोभित आणि वातानुकूलित आहे. मुलांच्या खाण्यापिण्यासाठी असलेले किचन, सीसीटीव्ही सुविधा आहे.

मुलांच्या करमणुकीसाठी सहज हाताळता येणारी खेळणी, आरामदायी बेड, छोटे-छोटे टेबल आहे.

मुलांची पुरेशी काळजी घेण्यासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 या वेळेत दोन महिला केअरटेकर सेवेत असतील.