भाजपची वॉशिंग मशीन फुटली; अब्बास अन्सारीला एनडीएत प्रवेश, मोदींना खोटारडा म्हणणाऱ्या राजभर यांनाही सोबत घेतले

अब्बास हा गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मुलगा आहे. सध्या तो कासगंजच्या तुरुंगात आहे. 5 नोव्हेंबर 2022 रोजी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने कित्येक तास चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली होती. त्याच्याविरोधात इतरही अनेक गंभीर गुह्यांची नोंद आहे. तर मुख्तार याने भाजपा नेते कृष्णानंद राय यांची हत्या केली होती.

भ्रष्टाचाऱ्यांना स्वच्छ करून आपल्या पक्षात घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे वॉशिंग मशीन आज फुटले. उत्तर प्रदेशातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेला सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचा आमदार अब्बास अन्सारीही एनडीएत सहभागी झाला. अब्बास हा कुख्यात माफिया मुख्तार अन्सारी याचा मुलगा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील एक नंबरचा खोटारडा नेता म्हणणारे सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांना भाजपने एनडीएत घेतल्याने अब्बासही एनडीचा भाग बनला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीवर नजर ठेवून भाजपाने मिळेल त्या आमदार, खासदाराला आपल्याकडे ओढण्यास सुरुवात केली आहे. मग तो भाजपचा कितीही टोकाचा विरोधक असला तरी त्याला भाजपकडून पक्षप्रवेश दिला जात आहे. ओमप्रकाश राजभर हे योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. मतभेद झाल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते सातत्याने योगी आदित्यनाथ यांच्यासह नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर जाहीर टीका करत आहेत. तरीही भाजपची दारे त्यांच्यासाठी उघडण्यात आली. त्यामुळे या पक्षाचा आमदार अब्बास अन्सारीही एनडीएचा भाग बनला आहे. अब्बास हा गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मुलगा आहे. मुख्तार अन्सारी, त्याचा भाऊ अफझल आणि मुलगा अब्बास हे तिघेही तुरुंगात आहेत.

अब्बास अन्सारी आर्थिक घोटाळय़ात जेलमध्ये
अब्बास अन्सारी सध्या कासगंजच्या तुरुंगात बंद आहे. 5 नोव्हेंबर 2023 रोजी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने कित्येक तास चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अब्बासवर मनी लॉण्डरिंगसह कलम 120 बी (कट रचणे), 379 (चोरी), 419 आणि 420 (फसवणूक) यांसह 423, 447, 465, 468, 471, 474 आणि 477 ए तसेच शस्त्र कायदा आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे असे अनेक गुन्हे त्यांच्यावर आहेत.

राजभर काय म्हणाले होते…
पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटारडे आहेत. जगात खोटे बोलण्यात पहिला नंबर मोदींचा, तर दुसरा नंबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आहे, अशी टीका ओमप्रकाश राजभर यांनी केली होती. राजभर यांचा हा जुना व्हिडीओ आज व्हायरल झाला.

क्या से क्या हो गया…मित्रांच्या शोधात शहा वणवण भटकताहेत
अब्बास अन्सारी आणि ओमप्रकाश राजभर यांच्या एनडीए प्रवेशानंतर राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. एकवेळ अशी होती, कितीही मोठा नेता असला तरी मोदी-शहा त्याचा पत्ता साफ करायचे. आज त्यांना एनडीएत येण्याची गळ घालण्यासाठी छोटय़ा पक्षांपुढे हात पसरावे लागत आहेत. राज्या-राज्यात वणवण भटकावे लागत आहे. मांझी, राजभर, माफियाचा मुलगा हा त्याचा प्रत्यय आहे. भाजपची अवस्था बिकट झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या भीतीने त्यांना पछाडलेय. ’क्या से क्या हो गया देखते देखते…’, असा टोला लालूंनी हाणला.