राज्यात गुंडांची दहशत; टोळक्याने हॉटेलमध्ये घुसून केला खून

राज्यात गुंड टोळय़ांची दहशत वाढली असून हॉटेलमध्ये मित्रांसोबत जेवायला थांबलेल्या पिंपरी-चिंचवडमधील गुंडाचा इंदापूरमध्ये टोळक्याने पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून केला. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास जगदंब हॉटेलमध्ये घडली आहे.

अविनाश बाळू धनवे (30, रा. वडमुखवाडी, चऱहोली, पिंपरी-चिंचवड) असे खून झालेल्याचे नाव आहे. खुशाल तापकीर , विशाल तापकीर (रा. आळंदी) मयूर पाटोळे (रा. वडमुखवाडी, आळंदी, ता. हवेली, जि. पुणे), राहुल चव्हाण, देवा सुतार, मयूर मानकर, शिवा बेंडेकर, सतीश पांडे, प्रकाश ऊर्फ पप्पू बनकर (सर्व रा. आळंदी, ता. हवेली, जि. पुणे) प्रणिल ऊर्फ बंटी मोहन काकडे, (रा. फलटण, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. अविनाशची पत्नी पूजा अविनाश धनवे (23 रा. चऱहोली, आळंदी रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

अविनाश आणि त्याचे मित्र मोटारीतून पंढरपूरकडे निघाले होते. जगदंब हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले. हल्लेखोरांनी खुर्चीत बसलेल्या अविनाशवर पाठीमागून पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. त्यानंतर पाच ते सहा कोयताधारी व पिस्तूलधारी हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोर मोटारीतून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन हल्लेखोरांना पकडण्याच्या सूचना दिल्या. पसार झालेल्या हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

गोळीबाराचा व्हिडीओ व्हायरल

हल्लेखोरांनी पिस्तुलातून केलेला गोळीबार आणि कोयता हल्ला हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.