परळच्या दामोदर हॉलची तिसरी घंटा बंद, नूतनीकरणाच्या नावाखाली मराठी माणसाच्या हक्काच्या व्यासपीठाचा अंत

मराठी व्यावसायिक नाटकांबरोबच नमन, शक्तीतुरे वाले, मराठी ऑर्केस्ट्रा, लोकनाटय़े, मराठी शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम, गिरणगावातील सामाजिक संस्था, संघटना यांच्या स्नेहसंमेलनांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या परळच्या दामोदर हॉलने आज अखेरचा श्वास घेतला. लालबागमधील भारतमाता सिनेमापाठोपाठ आज 1 नोव्हेंबरपासून परळचा दामोदर हॉल नूतनीकरणाच्या नावाखाली बंद होणार आहे. आज तिकीट काऊंटरच्या खिडक्या बंद करताना येथील कर्मचाऱयांमध्ये कमालीची अस्वस्थता होती. वयाच्या पन्नाशीत पोहचलेल्या येथील सफाई कामगारांपासून डोअर किपर, एसी ऑपरेटर, तिकीट तपासनीस यांच्यावर दामोदर हॉल बंद झाल्यामुळे बेकारीची कुऱहाड कोसळली आहे. पुन्हा या नाटय़गृहाचे दरवाजे उघडतील का, हा प्रश्न प्रत्येक कर्मचाऱयाला सतावत आहे.

29 ऑक्टोबरला दुपारी साडेचार वाजता अलबत्या-गलबत्या या नाटकाचा प्रयोग पार पडला. या नाटकाच्या जाहिरातीतही दामोदर हॉल येथे शेवटचा प्रयोग असा उल्लेख करण्यात आला होता. वर्ष 1922पासून सोशल सर्व्हिस लीग या संस्थेच्या दामोदर हॉलने मराठी रसिकांचे मनोरंजन करण्याचे काम चोख बजावले. मात्र नूतनीकरणाचे कारण देऊन मागील वर्षभरापासून एक महिन्याच्या वर कार्यक्रम, नाटकांचे आगाऊ बुकिंग घेणे थांबविण्यात आले. तसेच चालू वर्षाचे 2023-24चे लायसन्स नूतनीकरणही केलेले नाही.

राजीनामा घेतला, संस्थेने दिलेले 30 हजार किती दिवस पुरणार?

17 ऑक्टोबरला दामोदर हॉलमधील कायमस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचाऱयांकडून राजीनामे घेण्यात आले. आज त्यांना पगारही देण्यात आला. पगारासोबतच काही कर्मचाऱयांना तीस हजार रुपये आणि संस्थेची आठवण म्हणून घडय़ाळ भेट देण्यात आले. पण ही मदत किती काळ पुरणार, असा सवाल कर्मचाऱयांनी केला आहे. काहींच्या घरात कमावती व्यक्ती नाही. वयाची 50शी ओलांडल्याने दुसरीकडे नोकरी मिळण्याची शाश्वती नाही. त्यामुळे संस्थेने आम्हा कर्मचाऱयांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी दामोदर हॉलचे व्यवस्थापक सुंदर परब यांनी केली. शिवाय नूतनीकरणाच्या कामाला किती काळ लागेल, नवीन सभागृह उभे राहिल्यावर आम्हाला नोकरी मिळेल का, याविषयीही संस्थेने काहीच सांगितलेले नसून केवळ तोंडी सूचना देऊन राजीनामा घेतल्याचा आरोपही दामोदरमधील कर्मचाऱयांनी केला आहे.

दामोदर हॉल बंद होणार नाही. ज्या ठिकाणी हॉल आहे तेथे दोन आठ मजल्यांच्या इमारती प्रस्तावित आहेत. या इमारती पूर्ण होण्यासाठी 18 महिन्यांचा कार्यकाळ अपेक्षित आहे. या इमारतीतील सोशल सर्व्हिस लीग सीबीएसई शाळा, मराठी शाळा, नाईट कॉलेज शिफ्ट केले जाईल. आम्ही कोणत्याही कर्मचाऱयावर अन्याय केलेला नाही.
– आनंद माईणकर, अध्यक्ष, द सोशल सर्व्हिस लीग

2017ची निवडणूक आणि विश्वस्त बदल ठरावाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर 21 नोव्हेंबरला सुनावणी आहे. संस्थेच्या सध्याच्या विश्वस्त मंडळाने उप धर्मादाय आयुक्तांकडे नूतनीकरणाच्या कामासाठी परवानगी मागितली आहे. मात्र त्यांना परवानगी मिळालेली नाही. तरीदेखील नूतनीकरणाचे काम सुरू आहे. याच्या स्थगितीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– मोहन कटारे, माजी विश्वस्त