पंतप्रधान मोदींच्या रोड शोला परवानगी नाकारली, प्रशासनाने दिली 4 कारणे

तमिळनाडूच्या कोईम्बतूर प्रशासनाने भाजपला येथे पंतप्रधान मोदींच्या प्रस्तावित रोड शोला परवानगी देण्यास नकार दिला आहे. खरं तर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपने गुरुवारी कोईम्बतूर शहर पोलिसांना 18 मार्च रोजी पंतप्रधान मोदींच्या 3.6 किमी लांबीच्या रोड शोचे आयोजन करण्याची परवानगी मागणारे निवेदन सादर केले. कोईम्बतूर प्रशासनाने विविध कारणे सांगून परवानगी नाकारली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परवानगी देण्यास नकार देताना, कोईम्बतूर प्रशासनाने यामागील चार मुख्य कारणे सांगितली आहेत, ज्यात-

1- सुरक्षा धोका
2- कोईम्बतूरचा सांप्रदायिक इतिहास
3- सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्या
4- रोड शोच्या मार्गावर असलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास

अशा कारणांचा समावेश केला आहे.

आरएस पुरममध्ये संपणार होता रोड शो

आरएस पुरममध्ये भाजपचा प्रस्तावित रोड शो संपणार होता. आरएस पुरम हे तेच ठिकाण आहे जिथे 1998 मध्ये बॉम्बस्फोट झाले होते. शिवाय, कोईम्बतूरचे सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील स्वरूप पाहता, कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा गटाला रोड शो करण्याची परवानगी नाही.