कराड विमानतळावर प्रशिक्षण ऍकॅडमीचे विमान कोसळले, प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी

कराड विमानतळावर प्रशिक्षण ऍकॅडमीचे फोरसीटर विमान कोसळले. यामध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाला आहे. सोलो ट्रेनिंग सुरू असताना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. पॉवर वाढल्याने वैमानिकाला विमान कंट्रोल झाले नाही. त्यामुळे विमान कोसळले. सुदैवाने विमानाने पेट घेतला नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

कराड येथील विमानतळावर मुंबईच्या दमानिया एअरवेजच्या ऍम्बिसिअन्स फ्लाइंग क्लबने आठ महिन्यांपूर्वी वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. 20 प्रशिक्षणार्थींची पहिली बॅच येथे प्रशिक्षण घेत आहे. सध्या सोलो ट्रेनिंग सुरू आहे. प्रशिक्षण सुरू असताना फोरसीटर विमानाची पॉवर वाढली आणि विमान हवेत उडाले. त्यानंतर धावपट्टीवर संरक्षक भिंतीजवळ पलटी झाले.

विमानतळाच्या दक्षिणेकडील संरक्षक भिंत ही वारुंजी गावालगत आहे. अपघातापूर्वी विमान हवेत हेलकावे खात होते. थोडय़ाच वेळाने विमान भिंतीच्या आतील बाजूला कोसळले. या दुर्घटनेत प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाला आहे.

कराड विमानतळावर लॅण्डिंग धोकादायक बनले आहे. विमानतळ परिसरात उंच इमारती, मोबाईल आणि वीज वितरण कंपनीचे टॉवर, दोन बाजूला डोंगर आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी विमानतळ व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते रजेवर असल्याचे सांगण्यात आले. बेस इन्चार्जदेखील परगावी आहेत. विमान प्रशिक्षण केंद्राच्या संबंधित सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली.