अफगाणिस्तानमध्ये कोसळलेले विमान हिंदुस्थानचे नाही, ‘डीजीसीए’चं स्पष्टीकरण

अफगाणिस्तानमध्ये रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. मॉस्कोला जाणारे एक विमान बादाख्शान प्रांतामध्ये कोसळले. सुरुवातीला हे विमान हिंदुस्थानचे असल्याचे वृत्त अफगाणिस्तानचे स्थानिक न्यूज चॅनल ‘टोलो न्यूज’ने दिले. यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र आता हे विमान हिंदुस्थानचे नसल्याचे समोर आले असून विमान वाहतूक मंत्रालयाने (डीजीसीए) याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

विमान वाहतूक मंत्रालयाने रविवारी दुपारी ट्विट करत अफगाणिस्तानमध्ये कोसळलेले विमान हिंदुस्थानचे नसल्याचे स्पष्ट केले. अफगाणिस्तानमध्ये अपघातग्रस्त झालेले विमान हिंदुस्थानचे किंवा नॉन शेड्यूल्ड (एनएसओपी) किंवा चार्टर विमान नाही. हे मोरोक्कन नोंदणीकृत छोटे विमान असून याबाबत अधिक माहितीच्या प्रतिक्षेत आहोत, असे विमान वाहतूक मंत्रालयाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, याआधी पाकिस्तानी प्रसारमाध्यम समाने बादाख्शान प्रांतातील पोलिसांच्या हवाल्याने शनिवारी रात्री एक विमान रडारवरून गायब झाले असून जेबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात कोसळल्याचे वृत्त दिले होते. त्यानंतर रविवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास अफगाणि माध्यमांनी हे विमान हिंदुस्थानचे असून मॉस्कोला जात असल्याची माहिती दिली. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या कुटुंबियांनी काळजीने घेरले. अखेर अर्ध्या तासाने विमान वाहतूक मंत्रालयाने हे हिंदुस्थानचे विमान नसल्याचे स्पष्ट केले.