फ्रान्समध्ये अडकलेल्या विमान प्रवाशांच्या सुटकेत नवा ट्विस्ट; 50 जणांना हिंदुस्थानात परतायचे नाही

मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्सने गेल्या तीन दिवसांपासून 300 प्रवाशांसह रोखून ठेवलेले विमान सोडण्याचे निर्देश स्थानिक न्यायालयाने दिले होते. त्यामुळे उद्या मंगळवारी सर्व 303 प्रवाशांना घेऊन विमान मुंबई विमानतळावर दाखल होईल असे वाटत असतानाच त्यामध्ये आता नवा ट्विस्ट आला आहे. न्यायालयाने सर्वांना हिंदुस्थानला परतण्याची परवानगी दिली असली तरी तब्बल 50 प्रवाशांनी फ्रान्समध्येच आश्रय मागितला आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने उड्डाण करण्यासाठी सज्ज असलेल्या विमानाला विलंब होत आहे. हिंदुस्थानी कामगारांना एका खासगी कंपनीच्या विमानाने दुबईहून निकाराग्वामार्गे अमेरिका किंवा पॅनडाला पाठवले जात होते. सदर विमान इंधन भरण्यासाठी फ्रान्सच्या वाट्री विमानतळावर उतरले असता येथील सुरक्षा यंत्रणेला मानवी तस्करीचा संशय आल्याने तीन दिवसांपूर्वी प्रवाशांसह विमान ताब्यात घेतले होते. त्यानंतर सखोल चौकशी केल्यानंतर विमान उड्डाणाला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, विमानात असलेल्या 303 पैकी 2 प्रवासी संशयास्पद वाटल्याने त्यांची कसून चौकशी केल्याचे वृत्त एएफपी एजन्सीने दिले आहे.