हिंदुस्थानी नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱयांची सुटका मोदींमुळे नाही तर शाहरूख खानमुळे झाली ?

कतारमधील कथित हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात डांबलेल्या हिंदुस्थानी नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱयांची सुटका केली. यातले 7 अधिकारी हिंदुस्थानात परतले असून 1 अधिकारीही लवकरच हिंदुस्थानात परतणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कूटनीतीमुळे हे अधिकारी हिंदुस्थानात परतले असा दावा करण्यात येत आहे. मात्र भाजप नेते सुब्रमण्यमस्वामी यांनी हे अधिकारी हिंदुस्थानात परत येण्यामागे अभिनेता शाहरूख खानने मोठी भूमिका बजावल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतार दौऱ्याबाबत X वर पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना स्वामी यांनी म्हटले की, ‘पंतप्रधान मोदी यांनी सिने कलाकार शाहरूख खान याला कतारला न्यायला हवे. कतारच्या शेखचे मन वळवण्यात परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे प्रयत्न निष्फळ ठरले. यामुळे पंतप्रधानांनी शाहरूख खान याला गळ घातली आणि मध्यस्थता करण्याची विनंती केली. त्यामुळे कतारच्या शेखने महागडा सौदा करत अधिकाऱ्यांची मुक्तता केली.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी नवी दिल्लीहून यूएई आणि कतारच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी त्यांनी X वर एक पोस्ट केली होती, ज्यात त्यांनी म्हटले की, ते संयुक्त अरब अमिरातीच्या बंधूसमान राष्ट्राध्यक्षांना भेटण्यास उत्सुक आहेत.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते तिथल्या नेतृत्वाची भेट घेणार आहेत आणि नंतर ते अबू धाबीमधील मंदिराचे उद्घाटन करणार आहेत.