चंद्रज्योतीचा बिया खाल्याने सात बालकांना विषबाधा

चंद्रज्योतीच्या (जट्रोफा) बिया खाल्याने अंगणवाडीतील सात बालकांना विषबाधा झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात घडली आहे. या बालकांवर गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सर्व बालकांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.
मनीषा माणिकराव कोडापे (3), यतमा संजय कोडापे (३), नागू गंडू कोडापे (४), शामू गंडू कोडापे (२), विष्णू बारीकराव सिडाम (२), आदर्श कर्ण सिडाम (२), कृष्णा बारीकराव सिडाम (२) अशी या बालकांची नावे आहेत.

जिवती तालुक्यातील लांबोरी येथील अंगणवाडी इमारतीच्या बाजूला चंद्रज्योतीचे झाड आहे. अंगणवाडी परिसरात खेळत असताना या मुलांचे लक्ष त्या झाडावर गेलं. त्यांनी या झाडाच्या बिया खाल्ल्यानंतर काही वेळात त्यांना उलट्या होऊ लागल्या.मुलांना तात्काळ गावातील आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु उपकेंद्रात कुणीच उपस्थित नसल्याने त्यांना जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं.

केवळ नावाचाच तालुका

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका अद्यापही विकासाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. हा तालुका समस्यांचे माहेरघर बनला आहे. गावात मूलभूत सुविधांचा अभाव असून या तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाची इमारत तर आहे मात्र त्यात सोईसुविधा आणि उपकरणे अद्याप नाहीयेत. जिवती तालुक्यात आदिवासी कोलाम बांधवांची संख्या मोठी आहे. या बांधवांना आरोग्य सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी झाले आहे.